आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांची निवडणूक:उद्या नुटातर्फे रघुवंशी, बोर्डे, सिकची तर विरोधी गटातर्फे खेरडे, कुटे, ठाकरे मैदानात

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेट (अधीसभा) सदस्यांमधून व्यवस्थापन परिषद आणि इतर समित्यांवर पाठवावयाच्या सदस्यांसाठी आगामी मंगळवार, १४ मार्च रोजी निवडणूक होत आहे. नागपुर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसीएशन (नुटा) आणि अभाविप असा जुनाच सामना यावेळीही रंगणार असला तरी संख्याबळामध्ये ‘नुटा’च पुढे आहे. सिनेटची एकूण सदस्य संख्या ७६ आहे. त्यापैकी सात जागा अद्याप रिक्त असून उर्वरित ६९ सदस्यांमधूनच ही निवड केली जाईल. ६९ सदस्यांमध्ये कुलपती या नात्याने महामहीम राज्यपाल यांचाही समावेश आहे.

अधीसभेतून व्यवस्थापन परिषदेवर (मॅनेजमेंट कौन्सिल) आठ सदस्य निवडावयाचे आहेत. यापैकी ‘नुटा’ चे चार सदस्य अविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये प्राचार्य डॉ. विजय नागरे, प्रा. हरिदास धुर्वे, भय्यासाहेब मेटकर (नोंदणीकृत पदवीधर) व श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख (संस्थाचालकांचे प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. उर्वरित चारपैकी अनुसूचित जातीच्या प्राचार्य संवर्गाची एक जागा पात्रतेच्या अटी पूर्ण होत नसल्याने रिक्त राहणार असून तीन जागांचा फैसला आगामी १४ मार्चच्या बैठकीत होणार आहे.

या जागांसाठी नुटा विरुद्ध अभाविप अशी एकास-एक लढत आहे. प्राचार्य संवर्गातून सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खेरडे यांना अकोला येथील सिताबाई आर्ट-कॉमर्स-सायन्सचे प्राचार्य डॉ. रामदेव सिकची यांनी आव्हान दिले आहे. शिक्षक संवर्गातून नुटाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्या विरोधात मेहकर येथील डॉ. संतोष कुटे यांची उमेदवारी आहे. तर नोंदणीकृत पदवीधरांच्या एका जागेसाठी नुटा चे अविनाश बोर्डे विरुद्ध अभाविपचे अमोल ठाकरे असा सामना होणार आहे.

राज्यपालांच्या परवानगीनंतर सिनेटची पहिली बैठक १४ मार्चला दुपारी १२ वाजता होत आहे. या बैठकीतच ही निवड घोषित केली जाईल. तसे पत्र सर्व सिनेट सदस्यांना पाठविण्यात आले आहे. ३९ विजयी सदस्यांसह राज्यपालनामित १०, कुलगुरुनामित दोन, प्रताप अडसड व देवेंद्र भुयार हे दोन आमदार, चार अधिष्ठाता, १० संचालक आणि कुलपती, कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव एवढे सदस्य मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेऊ शकतील. नुटा व अभाविप या दोन्ही संघटनांच्या पुढाऱ्यांनी या सर्वांशी संपर्क सुरु ठेवला असून त्याचे प्रतिबिंब आगामी १४ मार्चच्या मतमोजणीअंती दिसून येणार आहे.

अशी आहे सिनेटची रचना

७६ सदस्यीय सिनेटचे ३९ सदस्य प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने नोव्हेंबर महिन्यात विजयी झाले आहेत. याशिवाय स्वत: राज्यपाल, कुलगुरु, प्र-कुलगुरु, ४ अधिष्ठाता (डीन), वेगवेगळ्या विभागाचे १० संचालक (डायरेक्टर), विद्यापीठ छात्रसंघाचे अध्यक्ष व सचिव, राज्यपालांद्वारे नामित १०, कुलगुरुंद्वारे नामित दोन शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रत्येकी एक जि.प. सदस्य व नगरसेवक, विधानसभेचे दोन व विधानपरिषदेचे एक असे ३ आमदार आणि कुलसचिव यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...