आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणूक:हर्षवर्धन देशमुख, अ‍ॅड. मोहता, मोघे, डॉ. रघुवंशी बनले सिनेट सदस्य

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
80 टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळवून ‘नुटा’ची मुसंडी - Divya Marathi
80 टक्क्यांपेक्षा अधिक जागा मिळवून ‘नुटा’ची मुसंडी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभेवर (सिनेट) शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख आणि अकोला येथील बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मोतीसिंह मोहता यांनी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य या मतदारसंघातून लक्षवेधक विजय प्राप्त केला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील माजी समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांचे पुतणे विजय मोघे हे यापूर्वीच या मतदारसंघात अविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय सिनेट, अ‍ॅकडेमीक व अभ्यासमंडळांच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करुन देणारे ‘नुटा’ संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी महाविद्यालयीन शिक्षक मतदारसंघातून सिनेटमधील आपले स्थान अबाधित राखले आहे.

विधान परिषदेचे माजी सदस्य तथा विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक प्रा. बी. टी. देशमुख यांच्या नेतृत्वातील ‘नुटा’ संघटनेची गेल्यावेळची प्रतिस्पर्धी संघटना, शिक्षण मंच यावेळीही मैदानात होती. परंतु या संघटनेचे प्रमुख शिलेदार प्रा. प्रदीप खेडकर यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान नुटाने तिन्ही प्राधीकारिणींमधील 80 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या आहेत. अमरावती विद्यापीठाच्या अधीसभा, विद्वत परिषद व अभ्यास मंडळासाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. मंगळवार, 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ही मतमोजणी आज, बुधवारी सायंकाळपर्यंत अव्याहतपणे सुरु होती.

पसंतीक्रमानुसार निवड करावयाची असल्याने या निवडणुकीत इव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा वापर केेला गेला. त्यामुळे मतमोजणीला बराच विलंब झाला. अधीसभेच्या 36 आणि विद्वत परिषदेच्या सहा तसेच 17 बीओएस अशाप्रकारे वेगवेगळ्या 43 संवर्गांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. अमरावती विभागात त्यासाठी 63 मतदान केंद्र उघडण्यात आली होती. मतमोजणीचे कार्य विविध आठ टेबलांद्वारे पुढे गेले. परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने शेवटचा निकाल हाती यायला तब्बल 36 तासांहून अधिक वेळ लागला. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या दिमतीला उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहायक कुलसचिव रवींद्र सयाम, अधीक्षक लांडगे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, विद्यापीठ अभियंता शशिकांत रोडे यांची चमू सज्ज होती.

बातम्या आणखी आहेत...