आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम-पेट निकालाबाबत संभ्रम:राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना सवलत नाकारल्याचा आरोप, सिनेट सदस्य कैलास चव्हाणांचे विद्यापीठाला पत्र

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अलिकडेच घोषित केलेला एम-पेट परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकणारा आहे. हा निकाल घोषित करतेवे‌ळी विद्यापीठाने राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना पाच टक्के गुणांची सवलत देत असतानाच संबंधित विद्यार्थ्याने किमान एका विषयात २२ गुण मिळविलेले असावेत, असे म्हटले आहे. मुळात तसे असतानाही अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले गेले, असा आरोप एआयएसएफचे सिनेट सदस्य प्रा. कैलास चव्हाण यांनी केला आहे.

त्यांनी यासंदर्भात विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांना पत्र लिहले असून एकतर विद्यापीठाने निकाल घोषित करण्यापूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार कृती करावी किंवा फेर अधिसूचना जारी करावी, अशी मागणी केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रभारी संचालक डॉ. मोनाली तोटे यांच्या स्वाक्षरीनिशी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार एम-पेट परीक्षा ही ५०-५० गुण अशाप्रकारे दोन भागात विभागून घेण्यात आली. त्यातील प्रत्येक प्रश्नाला एक गुण होता. त्यामुळे आरक्षित संवर्गातील एखाद्या विद्यार्थ्याने एका विभागात २२ (साडेबावीसऐवजी बावीस हे सूत्र निश्चित केले असल्याने) गुण मिळविलेले असेल आणि दोन्ही विभाग मिळून त्याच्या गुणांची बेरीज ही ४५ किंवा त्याहून अधिक होत असेल तर त्याला उत्तीर्ण घोषित करण्यात येईल. परंतु प्रत्यक्ष निकाल घोषित करताना मात्र या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले गेले, असे प्रा. चव्हाण यांचे म्हणणे आहे.

प्रा. चव्हाण हे सिनेटमध्ये पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे हा त्यांच्यासाठी प्राथमिकतेचा विषय आहे. त्यांच्यामते एम-पेटची परीक्षा २७ नोव्हेंबरला घेण्यात आली. त्यानंतर १५ डिसेंबरला सदर परीक्षेचा निकाल घोषित झाला. तत्पूर्वी ३ डिसेंबर रोजी विद्यापीठाने सदर अधिसूचना जारी केली. दरम्यान निकाल घोषित झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे तक्रारी नोंदवून सदर मुद्दा लक्षात आणून दिला. या सर्व विद्यार्थ्यांना ४५ पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असूनही त्यांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने एकतर त्यांना उत्तीर्ण घोषित करावे, नाहितर अधिसूचना तरी बदलवावी.

अधिसूचना बरोबर आहे

विद्यापीठाने जारी केलेली अधिसूचना बरोबर आहे. त्या अधिसूचनेचा सोयीचा अर्थ काढला गेल्याने ही बाब उद्भवली आहे. मुळात राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुण ४५ वा त्याहून अधिक असावे, असा उल्लेख करण्यापूर्वी त्याच अधिसूचनेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागात ४५ टक्के गुणांची आवश्यकता आहे, असे स्पष्ट केले आहे. परंतु तक्रारदारांनी केवळ त्या वाक्यापुढील तथापि… असा उल्लेख झालेल्या वाक्याचाच सोयीचा अर्थ काढला आहे. - डॉ. विजयकुमार चौबे, प्रभारी कुलगुरु, संगाबा. अमरावती विद्यापीठ, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...