आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:भाजपाच्या वतीने आज जिल्हा बंदचे आवाहन, जिल्ह्यातील परिस्थिती शांत मात्र काही ठिकाणी सकाळपासुन संचारबंदी लागू

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरातील विविध मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चानंतर शहरातील सात ते आठ दुकानांवर दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या निषेधार्थ शनिवारी हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपने ‘अमरावती बंद’चे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. जमावाने दगडफेक करत काही ठिकाणी जाळपोळ केली. पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार तसेच अश्रुधूर आणि रबर बुलेटचा वापर करावा लागला. दुपारी संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर स्थिती काहीशी नियंत्रणात आली. आज (दि. १४) भाजपाच्या वतीने जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तूर्तास जिल्ह्यातील परिस्थिती शांत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील अचलपूर, परतवाडा, चांदूरबाजार आदी ठिकाणी आज सकाळपासुन संचारबंदी लागू केली आहे.

कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या द्वेषाची शिकवण देत नाही; धर्मगुरुंचे नागरिकांना शांती, सद्भाव, एकता कायम ठेवण्याचे आवाहन
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर विविध धर्मगुरुंनी शांतता, सद्भाव व एकता कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या द्वेषाची शिकवण देत नाही. त्यामुळे कुणीही एक-दुसऱ्याचा द्वेष करु नये. सर्वांनी परस्परांशी बंधुत्वाने वागावे, असे या धर्मगुरुंचे म्हणणे आहे.

जातीय सलोखा हीच आपली ओळख
अमरावती ही विदर्भाची शान आहे. हे शहर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जातीय सलोखा ही या शहराची ओळख आहे. काल आणि सर्व धर्मीयांनी एकत्र येत बंधुभाव टिकवावा. शहरातील सर्व जाती-धर्माचे लोक वर्षानुवर्षांपासून एकत्र राहतात. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. -पद्मश्री प्रभाकरराव वैद्य,प्रधान सचिव, हव्याप्र. मंडळ, अमरावती.

शांतता, संयम राखण्याची गरज
गेल्या दोन दिवसांपासून शहरात उफाळलेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी आहे. अशावेळी शांतता व संयमाची गरज आहे. नागरिकांनी आपल्या विवेकाचा उपयोग करून निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक धर्म हा मानवतेची शिकवण देतो.त्यामुळे सर्वांनी मनुष्यधर्म पाळला पाहिजे. -वसंत महाराज श्रीमाळी, काशी विश्वनाथ मंदिर, सक्करसाथ, अमरावती.

सर्वधर्मियांनी जातीय सलोखा पाळावा
त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून काल व आज शहरात हिंसाचार झाला. यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले आहे. ते बघता सर्व धर्मियांनी संयम पाळावा. शांतता सलोखा राखावा. सर्वसामान्यांचे नुकसान टाळण्यासाठी विविध धर्मीयांनी शांततेसाठी प्रयत्न केले शहराची गाडी पुन्हा रुळावर येईल. -चंद्रशेखर भोंदू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघटन प्रमुख

शहराच्या आनंदासाठी सर्वांनी एकत्र यावे
आपापसातील सद्भाव कायम राखणे, हाच समाजाच्या प्रगतीचा खरा उपाय आहे. या घटनांमुळे अमरावतीच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. समाजाचे सुख हेच शहराचे सुख आहे. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिक असो वा लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत शहराच्या आनंदासाठी झटावे . एस. गुरबिंदरसिंग बेदी, अध्यक्ष, गुरुद्वारा गुरुसिंघ सभा, अमरावती.

अफवांना बळी न पडता एकता ठेवा
आपसातील सद्भाव कायम ठेवणे, हीच प्रत्येक धर्माची शिकवण आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, एकता कायम ठेवावी. सर्वांनी गुण्या-गोविंदाने राहणे, ही अमरावती शहराची जुनी ओळख आहे. ती पुसली जाणार नाही, याची काळजी घेणे, ही प्रत्येक धर्माची जबाबदारी आहे. हाफीज नाजीम साहब, अमरावती.

शांतता बाळगा, त्याशिवाय प्रगती नाही
प्रसंग कितीही अडचणीचा असू द्या. शांती बाळगणे आवश्यक असून त्याशिवाय प्रगती नाही. साधे उदाहरण घ्या, घरात कुणीही अशांत असले तर आपल्याला वाईट वाटते. समाजाचेही तसेच आहे. हिंदू, मुसलमान, सिख, इसाई यापैकी कुणीही अशांत असले तर प्रगती होणार नाही. एक-दुसऱ्याला माफ करा आणि प्रगतीपथावर जा. फादर जोसलीन,अमरावती धर्मप्रांत.

मानवता धर्माचे पालन करा
भारत देश हा बहुधार्मिक देश आहे. सर्व धर्मांचा आदर करण्याची शिकवण यातील प्रत्येक धर्म देतो. त्यामुळे नागरिकांनी मानवता धर्माचे पालन केले पाहिजे. सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी आपसात भांडणे न करता शिक्षण, आरोग्य, नोकरी यासारख्या मुलभूत मुद्द्यांवर काम करुन समाजहित साध्य करावे. - भदंत सत्यानंद महाथेरो, संस्थापक, धम्मप्रकाश विपश्यना केंद्र.

बातम्या आणखी आहेत...