आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य जलवाहिनी फुटली:अमरावती, बडनेरा शहराचा पाणी पुरवठा 3 व 4 जूनला राहणार बंद

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी तालुक्यातील सिंभोऱ्याहून अमरावतीशी जोडलेली मजीप्राची मुख्य जलवाहिनी आज, गुरुवारी उशीरा सायंकाळी अचानक फुटल्याने रहाटगावजवळ अक्षरश: जलाशय उभा ठाकला आहे. दरम्यान अचानक ओढवलेल्या या संकटामुळे अमरावती व बडनेराचा पाणी पुरवठा पुढील दोन दिवस बंद राहणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके आणि उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे हे दोन्ही अधिकारी संपूर्ण चमूसह घटनास्थळावर पोहोचले आहेत. त्यांच्यामते जलवाहिनी ज्या ठिकाणी फुटली त्याच्या बाजूला एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. सदर बांधकामासाठी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने पाणी त्या खड्ड्यात साचले आहे. जोपर्यंत पाणी बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत पाईपलाईन नेमकी कुठे फुटली, हे शोधणे अवघड आहे. त्यामुळे आज रात्री सर्वप्रथम खड्ड्यातील पाण्याचा उपसा केला जाणार आहे.

पाण्याचा उपसा करण्यासाठी मजीप्राने भाडे तत्वावरील यंत्रणा नियुक्त केली आहे. काही पोकलेन मशीन व पाणी उपसणारे पंप लवकरच घटनास्थळावर पोहचून काम सुरु होईल, असे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. त्यांच्यामते मध्यरात्रीपर्यंत उपसा पूर्ण झाल्यास त्यापुढील दुरुस्तीचे काम सुरु केले जाईल. त्यामुळे या क्षणाला काम किती काळ चालेल हे सांगणे शक्य नाही. परंतु मजीप्राची यंत्रणा दिवस-रात्र काम सुरु ठेवणार असून अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा शक्य तेेवढ्या लवकर कसा पूर्ववत करता येईल, याचा प्रयत्न करणार आहे.

मंत्र्यांच्या बैठकीला जाता आले नाही

राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, उद्या, शुक्रवारी मुंबईत एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता जाणार होते. बडनेराहून आज रात्री विदर्भ एक्सप्रेसने ते निघणार होते. परंतु ऐनवेळी ओढवलेल्या या संकटामुळे त्यांना मुंबईचा बेत रद्द करावा लागला. मुंबईच्या दिशेने निघण्याच्या वेळीच ही वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांना घटनास्थळाकडे वळावे लागले.

3 व 4 जूनचा पुरवठा बंद

मजीप्रा, अमरावतीचे उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे म्हणाले, ऐनवेळी ओढवलेल्या या संकटामुळे अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा 3 व 4 जून अर्थात शुक्रवार, शनिवारला बंद राहणार आहे. अमरावती-बडनेरला सध्या एक दिवसाआड पाणी दिले जाते. त्यामुळे शुक्रवार व शनिवारला ज्या परिसरात पाणी सोडले जाणार होते, त्या भागाला उद्या पाणी मिळणार नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांची काहिशी गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मजीप्रा दिलगीर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...