आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र मिनी ऑलिम्पिकच्या शुक्रवार ६ रोजी पहिल्याच दिवशी अमरावतीच्या महिलांनी अप्रतिम कामगिरी करताना रिकर्व्ह सांघिक गटात नाशिकला नमवून सुवर्णपदक पटकावले. अहमदनगरने कांस्यपदक जिंकले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापुढील देशातील सर्वोत्तम आर्चरी रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील रिकर्व्ह प्रकारात अमरावती महिला संघाने एलिमिनेेशन राउंडमध्येच अचूक लक्ष्यभेद करून सामने जिंकले व अंतिम फेरीत धडक दिली.
फायनलमध्ये अमरावतीच्या मंजिरी अलोणे, अवंती काळकोंडे, रिद्धी पोटे, साक्षी तोटे यांनी अचूक तीर सोडून नाशिकच्या महिलांना मात दिली. नाशिक संघात नक्षत्रा खोडे, तनुश्री सोनावरे, चारुता कमलापूर, मानसी थेटे यांचा समावेश होता. या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अहमदनगरने कांस्यपदक पटकावले. अमरावती संघातील खेळाडू या अनुभवी व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असलेल्या निष्णात तिरंदाज असून या चारही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीसह स्पर्धा गाजवल्या आहेत.
ओव्हर ऑल प्रकारात मात्र अमरावतीला अपयशाचा सामना करावा लागला. भारतीय धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदोरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या स्पर्धेत स्पर्धा संचालक सोनल बुंदीचे तर रिझल्ट इन्चार्ज अशोक जंगमे, सूरज खेडकर आहेत. कम्पाउंड प्रकारातील सांघिक गटात पुणे संघाने पहिला, सातारा संघाने दुसरा तर अकोला संघाने तिसरा क्रमांक पटकावला.
पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात नाशिक संघाने प्रथम स्थान पटकावले. या संघातील गौरव लांबे, कुणाल पवार, सुनील पवार आणि अर्जुन सोनवणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. मात्र, यजमान अमरावतीच्या महिला खेळाडूंनी देखणी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे सुरुवातीपासूनच या खेळाडू यश मिळवतील अशी आशा वाटायला लागली. अगदी अंतिम सामन्यापर्यंत कामगिरी तील सातत्य कायम ठेवत अमरावतीच्या महिला खेळाडूंनी बाजी मारली.
प्रथमच मोठया रेंजर खेळण्याची
ऑलिम्पिक नियमानुसार तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वोत्तम आर्चरी रेंजर प्रथमच खेळण्याची संधी राज्यभरातील खेळाडूंना मिळाली. या संधीचा लाभ त्यांनी भविष्यातील मोठया स्पर्धांसाठी होणार आहे. कारण या रेंजर एकाचवेळी ३२ खेळाडू ३२ टार्गेटवर तीर सोडत आहेत. हे दृश्य फारच मनोहारी दिसत असून त्यामुळे या स्पर्धेचे आकर्षण आणखी वाढल्याची माहिती आयचे महासचिव प्रमोद चांदोरकर व एमएडचे अध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.