आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Amravatikar Mesmerized By The Art Of Nritya Niketan At The Cultural Festival; Pride By Giving A Memento Of Sheetal Metkar At The Hands Of Vrushali Pusatkar |marathi News

समारोप:सांस्कृतिक महोत्सवात नृत्य निकेतनच्या कलाविष्काराने अमरावतीकर मंत्रमुग्ध; वृषाली पुसतकरांच्या हस्ते शीतल मेटकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही सारे फाउंडेशन, सोमेश्वर पुसतकर मित्र परिवार आणि उत्कल नृत्य निकेतनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोमेश्वर पुसतकर सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ओडिसी नृत्यांगणा शीतल मेटकर आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यांच्या कलाविष्काराने अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केले.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात तब्बल तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमात ‘एकला चलो रे...’, ‘वैष्णव जन तो...’, बाजे मृदंग टाक विणा, येरे नाचत गौरींना...’, “सुसंगती सदा घडो...’ आदी भजन, अभंग, कवितांवर एकाहून एक बहारदार नृत्यांचे सादरीकरण झाले. ओडिसी नृत्य परंपरेनुसार, ‘मंगलाचरण’ या सादरीकरणाने नृत्याविष्कार आरंभ झाला. त्यामधे वैदेही काकडे, धृती शेंडे, स्वरा राऊत, आयुषी देशमूख व इक्षिता वैद्य यांनी पद्मश्री गुरू अरुणा मोहंती रचित देवी स्तूती प्रस्तुत केली. त्यानंतर वीरा सवई, अंजली देशमुख, राई गणोरकर, संस्कृती वाघमारे व मानसी डोलारे यांनी मराठी अभंगावर आधारित ‘गणपती वंदना’ ओडिसी शैलीत सादर केली. पुढे शीतल मेटकर यांनी स्वरचित हिंदी कवितेवर आधारित नृत्यातून नवरसांचं विश्लेषण केले. महात्मा गांधींच्या आवडत्या नरसी मेहता लिखित ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ या गुजराती भाषेतील प्रसिद्ध भजनावर जान्हवी लोखंडे, कृष्णाई सदार, इक्षिता वैद्य, धृती शेंडे, स्वरा राऊत व आयुषी देशमुख यांनी अप्रतिम सादरीकरण केले. त्यानंतर जान्हवी जयस्वाल व वैदेही काकडे यांनी ‘शंकरावरम् पल्लवी’ हे ओडिसी शैलीतील लालित्यपूर्ण नृत्य सादर केले.

रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली भाषेतील सुप्रसिद्ध ‘एकला चलो रे...’ या गीतावर नृत्यनाटिकेतून सावित्रीबाई फुले, पर्यावरण रक्षक सुंदरलाल बहुगुणा, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, भगत सिंग अशा विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून, भारताचा स्वातंत्र्य लढा दाखविण्यात आला. या रचनेलाही जबरदस्त दाद मिळाली. त्यानंतर शीतल मेटकर यांनी कवी रामधारी सिंह दिनकर लिखित काव्य ‘कृष्ण की चेतावनी’ या अध्यायावर नृत्याभिनयाचा अभिनव प्रयोग सादर केला. कार्यक्रमाची सांगता संत ज्ञानेश्वर रचित ‘पसायदान’ ने झाली. शीतल मेटकर, वैदेही काकडे, धृती शेंडे, स्वरा राऊत, आयुषी देशमुख वा इक्षिता वैद्य यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने ‘पसायदान’ सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन ‘उत्कल’च्या संचालिका शीतल मेटकर यांनी केले. कार्यक्रमात वृषाली पुसतकर यांच्याहस्ते शीतल मेटकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...