आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी दुरुस्ती खोळंबली:अमरावतीकर तहानलेलेच; तिसऱ्या दिवशीही पाण्याचा ठणठणाट, सोमवारपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती येथील मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथून तपोवनच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहचवणारी दीड मीटर व्यासाची जलवाहिनी तिसऱ्या दिवशीही पूर्ववत होऊ शकली नाही. त्यामुळे अमरावीतकर तहानलेले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी पाणी न आल्याने नागरिकांचा घसा कोरडाच आहे.

पाणी पुरवठा खंडीत

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने याबाबत शुक्रवार, शनिवारी पाणी पुरवठा केला जाणार नाही, अशी सूचना आधीच जारी केली होती. परंतु दुरुस्तीकार्य लांबल्याने रविवार या तिसऱ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे आता सोमवारपर्यंत प्रतीक्षा केल्याशिवाय पर्याय, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान नागपुरची खासगी यंत्रणा आणि रतन इंडिया या कारखान्यातील सुमारे 20 कुशल कामगार अहोरात्र दुरुस्ती कार्य करीत आहेत. पाईपची लांबी सहा मीटर आणि रुंदी दीड मीटर असल्याने क्रेनच्या सहाय्याने त्याच्या हालचाली कराव्या लागतात. ठिकठिकाणी वेल्डींग आणि गास्केट फिटींग यामुळे या कामाला वेळ लागत असल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांच्या माहितीनुसार सदर पाईप बदलवण्यासाठी तब्बल सहा मीटर खोल खोदकाम करावे लागले. जलवाहिनीच्या बाजूला एका मोठ्या इमारतीचे काम सुरु असल्याने तेथे भला मोठा खड्डा होता. तो पाण्याने भरला गेल्याने आधी त्यातील पाणी उपसावे लागले. त्यानंतर मुख्य जलवाहिनीपर्यंत पोहचून जीर्ण झालेला पाईप बदलवण्याचे काम सुरु झाले. सदर पाईप लोखंड व सीमेंटच्या मिश्रणाचा आहे. त्यामुळे त्याची जोडणी अत्यंत कठिण असते. परंतु मजीप्राचे वरिष्ठ अधिकारी, कुशल कामगार आणि साधन-सामग्रीची उपलब्धता यामुळे ते अत्यंत कमी वेळात पूर्ण केले जात असल्याचा आत्मविश्वासही संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नेमके काय झाले होते ?

पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील सहा मीटर लांबीचा एक पाईप जीर्ण झाल्यामुळे पाण्याच्या दबावाने गुरुवारी सायंकाळी तो फुटला. रहाटगावनजिक ही घटना घडली होती. त्यामुळे तपोवनच्या जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणारे पाणी त्यादिवशीच खंडित झाले. परिणामी गुुरुवारी सायंकाळपासून अमरावती व बडनेरा येथील पाणी पुरवठा बंद आहे. ही जलवाहिनी तब्बल 25 वर्ष जुनी आहे. ती बदलवून पर्यायी जलवाहिनीची योजना मजीप्राने आखली आहे.

पुढे काय होणार ?

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आटोपल्यानंतर म्हणजेच सहा मीटर लांबीचा पाईप बदलवल्यानंतर आधी जलवाहिनीची ट्रायल घेतली जाईल. ट्रायल फत्ते झाल्यानंतर नेहमीप्रमाणे सिंभोरा येथून पंपींग सुरु होईल. पंपींगला किमान सहा तास लागतात. या कालावधीत पाणी जलशुद्धीकरण केेंद्रातून टाक्यांमध्ये पोहोचते. एकदा शहराच्या विविध भागांतील जलकुंभ भरले गेले की त्यानंतर नागरिकांच्या घरापर्यंत पाणी सोडले जाईल.

बातम्या आणखी आहेत...