आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावतीकर युवा संशोधक ऋषभ भुतडाचे शून्य गुरुत्वाकर्षणात (झीरो ग्रॅव्हिटी) काम करणारे स्पेस टॉयलेट माॅडेल अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने निवडले असून २०२४ च्या चंद्रावरील मोहिमेत त्याचा वापर केला जाणार आहे. आतापर्यंत विविध मोहिमांमध्ये अंतराळवीर मोठ्या माणसांसाठी वापरण्यात येणाऱ्या डायपरचा वापर करीत होते.
चंद्रावर स्थायी वसाहत स्थापण्याचा ‘नासा’चा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी ‘लूनर लू’चॅलेंज अंतर्गत नासाने ऋषभच्या स्पेस टॉयलेट माॅडेलची निवड केली. त्यामुळे हा युवा संशोधक आता अंतराळवीरांसाठी लागणाऱ्या स्पेस शौचालयाचे निर्माण करण्यासाठी योगदान देणार आहे. या संशोधनासाठी नासाच्या वतीने ऋषभला सुमारे २६ लाख रुपये (३५ हजार डाॅलर्स)अनुदान दिले जाणार आहे. स्पेस टॉयलेटसाठी नासाने ७०० कोटी रु.चे बजेट निश्चित केले आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी नासा युवा भारतीय संशोधकाच्या या संशोधनाबाबत पुढील घोषणा करणार आहे. सध्या तो नासा व हीरो एक्सद्वारे िदल्या जात असलेल्या ऑनलाइन निर्देशांनुसार काम करत आहे.
स्पेस टॉयलेट डिझाइन, निर्मिती स्पर्धेत प्रथम
चंद्रावर स्थायी वसाहत उभारण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या वतीने जानेवारी ते नोव्हेंबर २०२० दरम्यान स्पेस टॉयलेटचे डिझाइन व निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जगभरातील संशोधक, अभियंत्यांनी त्याचे माॅडेल्स सादर केले होते. यात ऋषभच्या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला. त्याची माहिती नुकतीच त्याला ई-मेलवर देण्यात आली तसेच नासाची सहकारी कंपनी व या उपक्रमाची आयोजक हीरो एक्सनेही ऋषभला या उपक्रमासाठी त्याच्या माॅडेलची निवड झाल्याची माहिती दिली.
शालेय जीवनापासूनच संशोधनाची आवड
शालेय जीवनापासूनच मला संशोधनाची आवड आहे, मी नासाच्या लूनर लू स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर नासाची सहकारी कंपनी हीरो एक्सने माझ्याशी संपर्क करून माझ्या स्पेस टाॅयलेटची निवड झाल्याची माहिती दिली. - ऋषभ भुतडा, युवा संशोधक.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.