आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या जि.प. तीन आग घातपात?:जि.प. कर्मचारी संघटनेच्या कार्यालयाला आग; पंकज गुल्हानेंना घातपाताचा संशय, पोलिसात तक्रार

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या कार्यालयाला आग लागल्यामुळे कार्यालयातील टिव्ही, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे बॅनर्स, शिक्षक बँकेच्या निवडणुकीचे पोस्टर-बॅनर्स आणि पत्रके तसेच इतर साहित्य जळून निकामी झाले. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी या आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त केला असून सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे साहित्य जळाल्याचे स्पष्ट केले आहे.

या संदर्भात गाडगेनगर पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी चौकशी आरंभिली आहे. संघटनेच्या अध्यक्षांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आज, मंगळवारी त्यांना जिल्हा परिषदेत राष्ट्रध्वजाची देखभाल करणाऱ्या शिपायांचा फोन आला. त्यावेळी आग नुकतीच लागली होती. शिपायाने आग लागल्याचे सांगून लगेच चावी घेऊन या, असे सांगितले. तर चावी माझ्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रावरमध्ये आहे, असे सांगत अध्यक्षांनी त्यास आग विझविण्याची विनंती केली. दरम्यान काही मिनीटातच ते जिल्हा परिषदेत दाखल झाले. तोपर्यंत कार्यालय उघडून आग विझविण्याची तयारी सुरु झाली होती. दरम्यान गुल्हाने यांनी तेथे पोहोचल्यानंतर लगेच लॅपटॉप व इतर महत्वाची कागदपत्रे बाहेर काढली. तोपर्यंत टीव्ही व निवडणूक प्रचाराची सामग्री मात्र अर्धवट जळून निकामी झाली होती.

या घटनेनंतर वीज विभागाच्या अभियंत्यांना पाचारण करुन आग शॉर्ट सर्कीटने तर लागली नसावी ना, याबाबत खात्री करण्यात आली. परंतु वीजेचे मीटर, इलेक्ट्रीक सप्लायचे बोर्ड आदी बाबींची खातरजमा केली असता तसा कोणताही प्रकार दिसून आला नाही. त्यामुळे या आगीमागे निश्चितच घातपात असल्याचा संशय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने लावला असून विरोधी पॅनलपैकी कुणीतरी हा प्रकार केला असावा, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान आग कशी लागली, याचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेतील सीसीटिव्ही फुटेजची मदत घेतली जाणार आहे.