आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाजी शिक्षण संस्थेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विमान आणि कपबशी अशा दोन चिन्हांमध्ये लढत होणार आहे.
आगामी नववर्षदिनी अर्थात 1 जानेवारीला या बँकेची निवडणूक होत आहे. प्रस्थापितांचे ‘प्रगती पॅनल’ आणि काही माजी पदाधिकाऱ्यांसह एकत्र आलेल्या मंडळीने तयार केलेले ‘शिवाजी पॅनल’ अशा दोन विचार प्रवाहांमध्ये या निवडणुकीचा संघर्ष बघायला मिळणार आहे. शिवाजी पॅनलने अलिकडेच माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप करताना त्यांची बाजू स्पष्ट केली असून सभासदांच्या (मतदार) हितार्थ आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध आमचा संघर्ष असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रगती पॅनल कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीत उतरली हे जाणून घेण्यास मतदार उत्सुक आहेत.
सदर बँकेचे संचालक मंडळ 17 सदस्यीय आहे. ही निवडणूक अविरोध व्हावी म्हणून प्रगती पॅनलने बराच प्रयत्न केला. बँकेच्या सर्व मतदारांमध्ये तसा संदेश रुजविण्याचाही प्रयत्न केला. परंतु अखेरपर्यंत त्यांना यश आले नाही. दरम्यान सदर पॅनलचे एक उमेदवार अक्षय इंगोले हे बिनविरोध विजयी झाले असून उर्वरित 16 जागांसाठी 1 जानेवारीला मतदान घेतले जात आहे. या निवडणुकीत तब्बल 30 उमेदवार मैदानात आहेत. प्रगती पॅनलचे 17, शिवाजी पॅनलचे 12 आणि इतर दोन अशी उमेदवारांची विभागणी आहे.
थेट शिवाजी शिक्षण संस्थेवर परिणाम
या निवडणुकीचा परिणाम थेट श्री. शिवाजी शिक्षण संस्थेवर होणार आहे. सदर बँक ही शिवपरिवारातील अत्यंत जिव्हाळ्याची वित्तीय संस्था आहे. संस्थेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे या बँकेत खाते आहे. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी लक्ष वेधलेल्या शिक्षण आणि शेती या दोन्ही क्षेत्रातील नामवंत या बँकेचे भागधारक व हितचिंतक आहेत. सध्या भाऊसाहेबांचा जयंत्युत्सव सुरु आहे. नेमक्या त्याचवेळी निवडणूक होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.