आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रेची तयारी:अमरावती जिल्ह्यात 30 हजार काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज तयार, सहा प्रचार रथही सज्ज

प्रतिनिधी । अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात नांदेडमार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेत जिल्ह्यातील ३० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहे.

वाशिममार्गे अकोल्यात प्रवेश करताना हे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्यासोबत पायी चालणार आहेत. त्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व माजी पालकमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांनी आज बैठक घेऊन नियोजन केले. अमरावती शहरातून ५ हजार तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ हजार असे ३० हजार कार्यकर्ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील जहागीर येथून १६ ऑक्टोबरला ही यात्रा सुरू होणार आहे. सकाळी सहा वाजता माजी आमदार प्रा. वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या धामणगाव रेल्वे-चांदुररेल्वे-नांदगाव खंडेश्वर मतदारसंघातील दोन हजार कार्यकर्ते खासदार राहुल गांधी यांच्यासोबत चालणार आहेत.

तर, दुसऱ्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी पातुर येथून सुरू होणाऱ्या पदयात्रेत जिल्ह्यातील सर्वच कार्यकर्ते सहभागी होऊन ते १८ आणि १९ नोव्हेंबरची पदयात्रा तसेच १८ ऑक्टोबरच्या शेगाव येथील जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. यात्रेमध्ये जिल्ह्यातील चौदाही तालुक्यामधील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर स्वयंस्फुर्तीने दाखल होणार आहेत.

‘भारत जोडो’ पदयात्रेच्या नियोजनासाठी आयोजित सभेला जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे, सोशल मीडिया विभागाचे संजय लायदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काळबांडे, बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, गिरीश कराळेआदी जनसंघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

सहा प्रचार रथांना हिरवी झेंडी

भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात प्रचार करण्यासाठी सहा प्रचार रथही सज्ज करण्यात आले आहेत. नियोजन बैठकीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या रथांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. माजी मंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर हे प्रचार रथ मार्गस्थ झाले. पदाधिकारी व कार्यकर्ते वाशिम आणि अकोल्याकडे रवाना होण्यापूर्वी हे रथ जिल्ह्यात प्रचार-प्रसार करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...