आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवाला 5 वर्षांची शिक्षा, अमरावती न्यायालयाचा निकाल:200 रुपयांसाठी आजोबांना फाशी देण्याचा 5 वर्षांपूर्वी केला होता प्रयत्न

अमरावती16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोनशे रुपये न दिल्याने 82 वर्षीय आजोबांना 35 वर्षीय नातवाने दुपट्ट्याने फाशी देण्याचा प्रयत्न केला होता. ही खळबळजनक घटना चांदुर रेल्वे तालुक्यातील भुईखेड गावात साडेपाच वर्षांपुर्वी घडली होती. या प्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी नातवाला जिल्हा न्यायाधीश (क्रमांक 1) एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्णय गुरूवारी (ता. 9) दिला आहे.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार, सुदर्शन अशोक पावसे (35, रा. भुईखेड, ता. चांदुररेल्वे, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर कृष्णा जानुजी पावसे असे फाशी देण्याचा प्रयत्न झालेल्या तक्रारदार आजोबांचे नाव होते. ही घटना 24 डिसेंबर 2016 ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास भुईखेड गावात घडली होती.

घटनेच्या दिवशी कृष्णा पावसे (82, रा. भुईखेड, चांदुररेल्वे) हे घरी बसले होते. दरम्यान त्यांचा नातु सुदर्शन हा घरात आला आणि त्याने आजोबा कृष्णा पावसे यांना दोनशे रुपये तसेच कंट्रोलचे कार्ड मागितले. परंतु आजोबांनी ते देण्यास नकार दिला. त्यामुळे सुदर्शनने त्याच्या जवळील दुप्पट्याला गाठ पाडून आजोबा कृष्णा पावसे यांना फाशी देण्याचा प्रयत्न केला. आजोबांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारी धावून आले आणि त्यांनी आजोबाला नातवाच्या तावडीतून सोडले.

या घटनेची तक्रार कृष्णा पावसे यांनी तत्काळ तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सुदर्शन पावसेविरुध्द जीव घेण्याचा प्रयत्न करणे तसेच अनाधिकृतरित्या घरात प्रवेश करणे, या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यात तळेगाव दशासर पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल पंकज रामेश्वर इंगळे यांनी एकुण तीन साक्षिदार तपासले. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच तक्रारदार कृष्णा पावसे यांचा वृध्दापकाळाने मृत्यू झाला. या प्रकरणात दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावास, आठ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महिने अतिरिक्त कारावासची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...