आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:दररोज सरासरी ६ जणांचा मृत्यू; १७ दिवसांत १०३ बळी

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड तपासणीत शासकीय अहवाल पॉझिटिव्ह, खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह

कोरोनाने दररोज जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू ओढवतो आहे. मार्च महिन्याचे हे सरासरी प्रमाण असून या महिन्याच्या पहिल्या १७ दिवसांत १०३ जणांचा बळी गेला. या कालावधीत जिल्ह्यातील ८ हजार ६४० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १.१९ टक्के व्यक्तींचा मृत्यू ओढवला. लागण आणि मृत्यूचे हे आकडे आरोग्य विभागासाठी आव्हान ठरले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यावर रोजच मंथन सुरु आहे. परंतु लागण आणि मृत्यूची सरासरी मात्र अजूनही कमी झाली नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरणे सुरु केले. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ९२६ ही नवी रुग्णसंख्या २३ फेब्रुवारीला नोंदली गेली. तर सर्वाधिक १२ ही मृत्युसंख्या २ मार्च रोजीची आहे. जास्त उष्णतामान असताना कोरोनाचा विषाणू शिथिल होतो, असे फार पूर्वी सांगितले जात होते. परंतु उन, वारा, पाऊस अशा तिन्ही प्रसंगाचा त्यावर फारसा परिणाम होत नाही, हे त्या विषाणूने आपल्या अस्तित्वातून दाखवून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्चचे आकडे आरोग्य व महसूल यंत्रणेसह राज्यकर्त्यांची झोप उडवून देणारे ठरले असून अमरावती हा देशातील पहिल्या सात जिल्ह्यांपैकी एक झाला आहे. हा नको असलेला विक्रम आहे. परंतु नागरिकांची बेफिकीर वृत्ती, स्थानिक राज्यकर्त्यांना उशीरा आलेली जाग आणि लॉकडाऊनबाबत शासन-प्रशासनाने वेळेत न घेतलेला निर्णय यामुळे हे गणित बिघडले आहे.

प्रशासनाची चिंता वाढली क्षुल्लक कारणांहून होणारी नागरिकांची गर्दी सर्वांची चिंता वाढवणारी ठरली आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या आठवडाभरापासून कोरोनाची लागण होण्याची संख्या कमी-जास्त होत आहे. परंतु ती सलग कमी व्हावी, अशा स्थितीत अद्यापही पोहोचली नाही. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून राज्य सरकारनेही कठोर निर्बंध घातले आहेत.

कोविड तपासणीत शासकीय अहवाल पॉझिटिव्ह, खासगी लॅबमध्ये निगेटिव्ह
परतवाडा- कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने कोविड चाचणी करण्याचे आवाहन केल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, व्यावसायिक ही चाचणी करण्याकरिता उत्स्फूर्त प्रतिसाद देत शासकीय कोविड चाचणी केंद्रावर गर्दी करीत आहेत. मात्र शहरातील कुटीर रुग्णालयात बुधवारी (दि. १७) रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर परतवाड्यातील खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता, दोघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अँटिजेन किट शासनाची योग्य की खासगीची, असा प्रश्न आहे. काही दिवसापूर्वी देवमाळी येथील एका युवकाचाही अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्राप्त झाला होता. बुधवारी कांडली येथील दिवाकर कोरडे (५५) यांनी कुटीर रुग्णालयात चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर डॉ. आर. टी. भंसाही यांच्या खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आला. असाच प्रकार श्रीकांत ज्ञानेश्वर हिरूळकर (२३) यांच्यासोबत घडला. या दोघांचेही दोन्ही अहवाल वेगवेगळे आल्याने संशय निर्माण होत असून अँटिजेन किटच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुन्हा चाचणी करण्यात येईल : दोन व्यक्तींचे अहवाल खाजगी व शासकीय चाचणीत वेगवेगळे आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांची पुन्हा चाचणी करून नेमके काय कारण याची माहिती आरोग्य विभागाकडून घेतल्या जाईल अशी प्रतिक्रिया अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.

दिवसभरात ४०६ नवे रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यांतील विविध रुग्णालयांमध्ये ४०६ नवे कोरोनाबाधीत नोंदले गेले. त्याचवेळी दिवसभरात ६ जणांचा मृत्यूही ओढवला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ४३ हजार ४५७ वर पोहोचली असून मृत्यूचा आकडा ६१४ झाला आहे. बुधवारी मृत झालेल्यांमध्ये कंझरा, नांदगाव खंडेश्वर येथील ७० वर्षीय पुरुष, गाडगे नगर, अमरावती येथील ६५ वर्षीय महिला, नया अकोला, अमरावती येथील ७५ वर्षीय पुरुष, कारंजा लाड, वाशीम येथील ७० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

सूट आहे, पण नियमांचे पालन सर्वांना करावेच लागेल
गुरुवारपासून बाजारपेठेची वेळ तासाभराने वाढवून देण्यात आली आहे. परंतु राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या नियमांचे सर्वांना पालन करावेच लागेल. व्यापारी प्रतिष्ठानांचे संचालक व त्यांच्या आस्थापनांमधील कामगारांना ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवावे. ‘नो मास्क-नो सर्विस’ ची काळजी त्यांना घ्यावी लागेल. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

वरिष्ठांना माहिती देवून मार्गदर्शन घेवू
कोविड चाचणी अंतर्गत प्राप्त झालेले अहवाल वेगवेगळे आल्याने नेमके कारण कळू शकले नाही. मात्र मात्र या रुग्णांची आरटीपीसीआर करून घ्यावी लागेल. वेगवेगळे अहवाल आल्याने याबाबत वरिष्ठांना माहिती देवून मार्गदर्शन मागवल्या जाईल. - डॉ. सुरेंद्र ढोले, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर

दोन्ही अहवालांमुळे उडाला गोंधळ
कोविड चाचणी करण्याच्या अनुषंगाने कुटीर रुग्णालयात गेलो होतो. माझा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे माहिती पडताच मी अस्वस्थ झालो. माझा रक्तदाब वाढला. त्यानंतर मी खाजगी लॅबमध्ये तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. या दोन्ही अहवालामुळे माझा गोंधळ उडाला. - दिवाकर कोरडे, कांडली

बातम्या आणखी आहेत...