आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा बैठक:मेळघाटात आरोग्य सुविधांसोबतच निदानात अचूकता हवी, खासदार डॉ. अनिल बोंडेंचे प्रतिपादन

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाटात सर्वदूर शिबीरांचे आयोजन करावे. क्षयरोगाची तपासणी करताना रुग्णांकडुन घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी. खाजगी रुग्णालयांत क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशा सूचना खा. डाॅ.अनिल बोंडे यांनी सोमवार 29 रोजी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदारांनी घेतला. बैठकिला माजी आ. रमेश बुंदिले, माजी महापालिका सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल पांचाळ, निवेदिता दिघडे चौधरी आदी उपस्थित होते.

काम प्राधान्याने करावे

दर्यापूर, धारणी, अचलपूर, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, वरुड व चुरणी या सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्णांची तपासणी व निदान करणारी यंत्रे चालू आहेत किंवा कसे याची माहिती तात्काळ सादर करावी. मेळघाटातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तात्काळ सादर करुन त्याबाबत पाठपुरावा करावा. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम प्राधान्याने करावे. अशा सूचना डाॅ. बोंडे यांनी यावेळी दिल्या.

जगजागृती आवश्यक

मेळघाटात प्रामुख्याने बालके, महिला व सामांन्यांमध्ये आढळणाऱ्या सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. या आजाराचे प्रमाण शोधून काढणे, चाचणी व उपचार करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. सिकलसेलचे निदान करणारी किट जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा आदिवासी उपयोजनेतुन निधी प्रस्तावित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना ते म्हणाले की, गावात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी. बचतगटांना मानधन तत्वावर ती स्वच्छतागृहे देखरेखीसाठी सोपविण्यात यावी. या स्वच्छता गृहाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्यास खासदारांनी सुचविले.

आधुनिक शस्त्रक्रिया करावी

दृष्टीदोष असलेल्या बालकांना मोठ्या भिंगाचे चष्मे दिल्यास त्यांच्यात न्युनगंड निर्माण होऊ शकतो. त्यांच्यातील दृष्टीदोषावर आधुनिक शस्त्रक्रिया करता यावी याकरीता स्थानिक नेत्रतंज्ज्ञाचे सहकार्य घ्यावे. चिखलदरा, मेळघाट भागात सध्या त्वचेचे आजार उद्भवले असुन त्यावर उपचार होणे गरजेचे आहे असे सांगुन आशा सेविकांनी येणारे पंधरा दिवस मोहिम स्वरुपात राबवुन याबाबत सर्वेक्षण करावे, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...