आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्राण्यांची शिकार, तस्करी अंधश्रद्धेतून, व्याख्यानमालेत वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांचे प्रतिपादन

वर्धा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वन्यजीवांचे गुप्तांग, हाडांची भुकटी खाल्ल्याने लैंगिक क्षमता वाढते. वाघाच्या मिशांनी कुणाला मारता येते. यासारख्या गैरसमजातून तसेच पैशाचा पाऊस, गुप्तधन शोधणे, दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी विविध वन्यजीव व त्यांच्या अवयवांची मागणी मांत्रिक, बाबा करत असतात. ते मिळवण्याच्या नादात नागरिकांची लाखोंची लुबाडणूक होते. मागे विविध गैरसमज, अंधश्रद्धा कारणीभूत आहेत, असा दावा विविध पुरावे देत बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांनी केला.

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या ४० वर्ष पूर्ती प्रबोधन महोत्सव, ‘४० वर्ष प्रबोधनाचे - ४० युवा व्याख्यान’ निमित्त युवा शाखेद्वारा नागपूर येथून सुरू करण्यात आलेला राज्यस्तरीय ‘युवा वक्ता संवर्धन प्रकल्प - २०२२ अंतर्गत दि. १२ जून रोजी समग्र युवा जागृती व्याख्यान मालेच्या सतराव्या पुष्पात, आभासी व्याख्यानात ते ‘वन्यजीव व अंधश्रद्धा’ विषयावर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डाॅग फादर म्हणून प्रसिद्ध असलेले किरण मोकद्दम सचिव - विसावा अ‍ॅनिमल फाउंडेशन, वर्धा हे उपस्थित होते. प्रा. श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या अ.भा.अंनिस चळवळीला या वर्षी ४० वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्त अ.भा.अंनिस युवा शाखेने ४० वर्षपूर्ती प्रबोधन महोत्सव २०२२ आयोजित केलेला आहे. या अंतर्गत आतापर्यंत १६ जिल्ह्यात तीन दिवसीय महिला व युवा शाखा पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा, ६ राज्य स्तरीय चार दिवसीय वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा, तसेच नवोदित वक्त्यांनी समग्र युवा जागृती व्याख्यान मालेत १६ पुष्प गुंफले आहे.

सतराव्या पुष्पाच्या विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना निलेश गावंडे यांनी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२, जादूटोणा विरोधी कायदा २०१३ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. वाघ, खवल्यामांजर, घुबड, मांडोळ साप, अस्वल , कासव यांची शिकार व तस्करी होत आहे. पैशाचा पाऊस, गुप्तधन, जादूटोणा, लैंगिक शक्ती वाढवण्याचे भंपक दावे आणि अंधश्रद्धांमुळे या प्रजाती धोक्यात येत आहे. अशा अंधश्रद्धा व गैरसमजावर कुणीही विश्वास करू नका. वनविभागाने अनेक ठिकाणी कार्यवाही करून अनेकांना अटक केली आहे. वन्यजीवांची शिकार, तस्करी होतांना दिसताच, समजताच वन विभागाच्या हेल्पलाईन क्र. १९२६ क्र. वर संपर्क करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी व किरण मोकद्दम यांनी राज्यभरातून जनतेने विचारलेल्या अनेक प्रश्नांची थेट उत्तरे दिली. या व्याख्यानाचे संचालन सुमेध जाधव सदस्य अ.भा.अंनिस युवा शाखा, जि.बुलडाणा, प्रास्ताविक नसिर पठाण सदस्य, अ.भा.अंनिस युवा शाखा, जि. अहमदनगर, परिचय दिप्तांशू खुदरे बाल सदस्य अ.भा.अंनिस युवा शाखा नागपूर, आभार प्रदर्शन रितेश पाटील,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रचार पत्रक निर्मिती कमलेश शरणागत यांनी केले.

वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे.

बातम्या आणखी आहेत...