आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात उडीद व मुग या पिकांचा मंजूर असलेल्या पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या खरीप हंगामात दर्यापूर तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची, तर ७४०४ हेक्टरवर मूग, ७२७१ हेक्टर क्षेत्रात उडीद आणि १४,२२८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकांची पेरणी करण्यात आली होती, तर अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये तूर ८१५० हेक्टरवर, मूग १६७ हेक्टर, उडीद ३२४ हेक्टर, सोयाबीन १४६८४ हेक्टर व कपासी १८२७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आल होती. याशिवाय अंजनगाव तालुक्यात ३३०० हेक्टर क्षेत्रावर संत्रा व केळीच्या बागादेखील आहेत.
अतिवृष्टीमुळे या सर्वच पिकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झालेले असल्याने याची पण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यात यावी, अशी मागणी या वेळी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील या वर्षी खरीप हंगामात एकूण ६१४ मिलीमीटर पाऊस झाला. गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ४६३ मिलीमीटर पाऊस झाला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे अंजनगाव व दर्यापूर या दोन्ही तालुक्यामधील मूग, उडीद, सोयाबीन, संत्रा, केळी, ज्वारी, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
या बाबत निवेदनकर्त्यांद्वारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना लेखी पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून माहिती देण्यात आली. सततच्या पाठपुराव्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपन्यांसोबत बैठका घेऊन दर्यापूर व अंजनगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये मूग व उडीद पिकांसाठी विमा मंजूर करून घेतला आहे. विम्याची रक्कम त्वरित १५ दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. नुकसान झाल्यावर एक महिन्यात नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती. परंतु, नवीन वर्ष सुरू झाले, तरी अद्यापपर्यंत पीक विमा जमा झाला नाही. याकडे कृषी विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणीही या प्रसंगी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
आंदोलनाचा दिला इशारा तातडीने मूग व उडीदाच्या पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास जिल्हा कृषी कार्यालयात आंदोलन छेडण्यात येईल , त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा कृषी अधिकारी म्हणून आपणावर राहील, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून शिंदे गट जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिला आहे. निवेदन देतेवेळी उपजिल्हाप्रमुख सुनील केने, शरद आठवले, अॅड. व्ही. एन. देशपांडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.