आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीचा वाजला बिगूल:जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांच्या निवडणुकांची घोषणा, 27 पासून तयारी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील डझनभर बाजार समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यानुसार पुढील वर्षी 29 जानेवारीला मतदान तर 30 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.

जिल्ह्याच्या सहकार विभागाने त्यासाठीची तयारी सुरु केली असून आगामी 27 सप्टेंबरपासून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्याचवेळी 23 डिसेंबरपासून प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली जाईल. जिल्ह्यात अमरावती-भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड व धारणी या बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

या सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ आधीच संपुष्टात आला आहे. त्यामुळे शासनाने निवडणुकांचा कार्यक्रमही घोषित केला होता. परंतु दरम्यानच्या काळात काही जणांनी न्यायालयात धाव घेऊन आधी कार्यकाळ संपुष्टात आलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी केल्याने तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यानच्या काळात सर्वच तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेण्यात आल्या असून त्यांच्याद्वारे बाजार समितीवर पाठविण्याच्या प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग सुकर झाला आहे.

राज्य शासनाच्या ताज्या कारवाईनुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रत्यक्ष प्रक्रिया मतदार यादी अंतिमत: प्रकाशित झाल्यानंतर सुरु केली जाणार आहे. त्यानुसार यावर्षीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 23 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणे प्रारंभ होईल. 29 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून 30 डिसेंबरला छाननी केल्यानंतर नव्या वर्षात 2 जानेवारीला वैध नामांकनाची यादी घोषित केली जाईल. त्यानंतर 2 ते 16 जानेवारीपर्यंत माघार घेण्यास मुदत देण्यात आली असून 17 जानेवारीला उमेदवारांच्या अंतीम यादीसह चिन्हांचे वितरण केले जाईल. पुढे 29 जानेवारीला मतदान आणि 30 जानेवारीला मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी दाखल करणे 23 ते 29 डिसेंबर

उमेदवारी अर्जांची छाननी 30 डिसेंबर

वैध, अवैध अर्जांची घोषणा 2 जानेवारी

उमेदवारी मागे घेणे 2 ते 16 जानेवारी

चिन्ह वाटप 17 जानेवारी

मतदान 29 जानेवारी

मतमोजणी 30 जानेवारी

बातम्या आणखी आहेत...