आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य जलवाहिनीतील लिकेज झालेला पाइप बदलवण्याचे काम रविवारी उशीरा रात्री पूर्णत्वास गेले. परंतु तरीही सोमवारी सकाळी शहरवासियांना पाणी मिळू शकले नाही. दरम्यान, शहराच्या काही भागात सायंकाळचा पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे करण्यात आला, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने म्हटले आहे. मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथून तपोवनच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचविणारी दीड मीटर व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सायंकाळी रहाटगावजवळ फुटली होती. त्यामुळे अमरावती व बडनेरावासियांचा पाणीपुरवठा पूर्वी शुक्रवार, शनिवार असे दोन दिवस थांबवण्यात आला. परंतु जलवाहिनीचे दुरुस्तीकार्य लांबल्यामुळे रविवार आणि सोमवारीही जुळ्या शहरवासीयांना पिण्याचे पाणी मिळू शकले नाही. परिणामी सोमवारी चौथ्या दिवशीदेखील अमरावतीकरांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. शहराच्या अनेक भागात टँकर व इतर साधनांचा वापर करुन नागरिकांना पाणी मिळवावे लागले. मजीप्राचा पाणी पुरवठा अचानक बंद पडल्यामुळे शहरात कॅनद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्यांनीही दरवाढ केली होती. भली मोठी रक्कम अग्रीम दिल्यानंतरच नागरिकांना मर्यादित स्वरुपात पाण्याच्या कॅन उपलब्ध झाल्या. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम आटोपल्यानंतर नेहमीप्रमाणे सिंभोरा येथून पंपींग सुरु करण्यात आले.या पंपींगला किमान सहा तास लागले. या कालावधीत पाणी जलशुद्धीकरण केेंद्रातून टाक्यांमध्ये पोहोचविण्यात आले. हे पूर्ण करेपर्यंत सोमवारची दुपार उजाडली होती. त्यामुळे शहराच्या ज्या भागाला सकाळी पाणी पुरवठा केला जातो, तो करता आला नाही. परंतु सायंकाळच्या सत्रात ज्या भागात पाणी सोडले जाते, तेथील पुरवठा मात्र केला गेला, असे उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी ‘दिव्य मराठी‘ला सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.