आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेगाव (सोनल कॉलनी) ते अर्जुननगर हा मार्ग मागील दिड वर्षांपासून अतिशय खड्डेमय झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘प्रहार’ने मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे, मात्र तरीही मनपाकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. अखेर सोमवारी (दि. ६) ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी मनपा शहर अभियंत्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. रस्त्याचे काम सुरू होईस्तोवर दालनातून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. शेगाव ते रहाटगाव या मुख्य रस्त्यापासून नागपूर महामार्गाला जोडणारा व दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेला सोनल कॉलनी ते अर्जुननगर मार्गातील सुमारे एक किलोमीटर मार्ग मागील दिड वर्षांपासून अतिशय वाईट स्थितीत आहे.
मात्र त्या रस्त्याची दुरुस्ती मनपाकडून झाली नाही. या रस्त्यांवर पावसाळ्यानंतर काही ठिकाणी मोठ मोठ्या खड्ड्यांमध्ये खडी टाकली होती. मात्र ती खडी आता खड्ड्यांच्या बाहेर पडली आहे. त्यामुळे नव्याने खड्डे तयार झालेच आहे, तसेच खडी रस्त्यावर आल्यामुळे दुचाकी चालकांसाठी अतिशय धोकादायक झाला आहे. या मार्गावर दरदिवशी दुचाकी घसरल्याने किंवा खड्ड्यांमुळे दुचाकी अनियंत्रित होवून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत, मात्र मनपा प्रशासनाकडून अजूनही या रस्त्याच्या कामाचा ‘श्रीगणेशा’ झाला नाही.
सदर रस्त्याचे काम पुर्ण करुन ये- जा करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा देण्याची, मागणी ‘प्रहार’ने निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाला यापूर्वीच केली होती. मात्र मनपा प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेता रस्त्याचे काम करण्यात आले नाही. दुसरीकडे नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाची दखल ‘प्रहार’ने घेतली आणि ‘प्रहार’चे संपर्कप्रमुख चंदू खेडकर त्यांच्या सहकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मनपा शहर अभियंता इक्बाल खान यांच्या दालनात सोमवारी (दि. ६) सकाळी साडेअकरा वाजता पासून ठिय्या दिला आहे. या रस्त्याचे काम सुरू येईस्तोवर आम्ही दालनातून हलणार नाही, अशी आक्रमक भूमिका प्रहार कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यावेळी खेडकर यांच्यासह गुड्डू ढोरे, सचिन कथलकर, सागर बावनवाकडे, दिनेश वानखडे, दिनेश बोंडे, बंडू इंगळे, रामकृष्ण गोरडे हे सहभागी झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.