आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादर्यापूर शहरातील जयस्तंभ चौकात रात्रीच्या वेळी दोन युवक हातात पिस्तूल घेवून बिनधास्तपणे जात असतानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि. १५) सकाळी समोर आली. या घटनेने जनमाणसात मात्र भीतीचे वातावरणात निर्माण झाल्याचे चित्र शहरात दिसून आले.
शहरातील जयस्तंभ चौकातील उतरत्या रस्त्यावरुन दोन तरुण युवक जात होते. दरम्यान त्यापैकी एकाच्या हातात खुलेआम फिल्मी स्टाईलने पिस्तूल घेवून रस्त्याने जात असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे. त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. घटनेचे गांर्भीय बघता जिल्हास्तरावरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही स्थानिक पोलिसांना घटनेबाबत विचारणा करीत तातडीने तपास कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्रभारी ठाणेदार विनायक लंबे, एपीआय किरण औटी, नपोकाँ सिद्धार्थ आठवले व पोलिसांनी जयस्तंभ चौकात भेट देवून तपासाची चक्रे फिरवली व १२ तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावला आहे. या घटने प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली.
रात्रगस्त वाढवा, नागरिकांची मागणी
दर्यापूरात भर रस्त्यावर पिस्तूल घेवून व्हायरल झालेल्या व्हिडोओच्या अनुषंगाने शहरात रात्री पोलिसांची काटेकोरपणे पेट्रोलिंग होत नसल्याची अोरड जणमाणसातून होत आहे. तसेच अशाप्रकारे शहरात गुंडगिरी खुलेआम वाढणार काय, अशी भीती व प्रश्नही यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला असून शहरात सर्वत्र पोलिसांनी रात्र गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
''सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची आम्ही पडताळणी केली. १५ दिवसांपुर्वी एका महिलेने उत्सुकतेपोटी रात्री साडेबारा वाजता व्हिडीओ काढलेला आहे. दरम्यान व्हिडीओत दिसणाऱ्या मुलांच्या हालचाली व पोशाखावरून त्या मुलांचा शोध घेतला आहे. व्हिडीओतील युवक हे गुंड प्रवृत्तीचे नाहीत. त्यांच्या हातात पिस्तूलसारखे दिसणारे लायटर आहे. गुन्ह्याचा प्रकार नसून दोन्ही युवकांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विशवास ठेवू नये.'' - विनायक लंबे, प्रभारी ठाणेदार, दर्यापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.