आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचा आमदार कोण, याचा फैसला उद्या, गुरुवार 2 फेब्रुवारीला होणार आहे. बडनेरा रोड स्थित नेमानी गोडावूनमध्ये सकाळी 8 च्या ठोक्याला प्रत्यक्ष मतमोजणी सुरु होईल. मतमोजणीसाठी 28 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येक टेबलावर एक हजार मतपत्रिका याप्रमाणे एका फेरीत 28 हजार मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. झालेले मतदान 1 लाख 2 हजार 493 आहे. त्यामुळे या सर्व मतपत्रिकांची पहिली हाताळणी (प्रथम पसंती जाणून घेणे) चार फेऱ्यानंतर पूर्ण होईल. सदर निवडणूक पसंतीक्रमावर आधारित असल्याने एकूण वैध मतांच्या निम्म्याहून एक मत अधिक (कोटा) घेणारा उमेदवार विजयी होणार आहे. अर्थात पहिल्या पसंतीची एवढी मते पहिल्याच हाताळणीत (जी चार फेऱ्यांमिळून पूर्ण होते) मिळविणे हे कुण्या एका उमेदवारासाठी कठिण आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतेही मोजावी लागतील, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे सदर मतमोजणी शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसारखी दोन दिवसही चालू शकते. त्यामुळे आमदारकीचा फैसला नेमका उद्याच होणार की त्यापुढच्या दिवसाला होणार, हे आत्ताच सांगणे कठिण आहे.
या निवडणुकीत 23 उमेदवारांनी भाग्य अजमावले आहे. त्यात मुख्य लढत मावळते आमदार भाजपचे डॉ. रणजीत पाटील व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे (काँग्रेस) यांच्यात आहे. मतदानाचा टक्का फारच कमी (49.63) असल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नेमके कोण बाजी मारणार, हे उद्याच्या मतमोजणीअंतीच स्पष्ट होईल. दरम्यान मतमोजणीच्यादृष्टीने संपूर्ण प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून सुमारे दीड हजार अधिकारी-कर्मचारी याकामी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या नेतृत्वात पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, निवडक एसडीओ-तहसीलदार यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या विविध चमू मतमोजणीस्थळी सज्ज झाल्या आहेत. मतमोजणीच्यादृष्टीने त्यांची प्रशिक्षणेही पूर्ण झाली आहेत.
विजयासाठीचा कोटा कसा ठरेल ?
आमदाराची निवड पसंतीक्रमाद्वारे निश्चित होत असल्याने या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एक विशिष्ट सूत्र ठरविण्यात आले आहे. झालेल्या मतदानापैकी जेवढ्या मतपत्रिका वैध आहेत, त्या मतपत्रिकांच्या निम्म्याहून एक मत जास्त, असे ते सूत्र आहे. उदाहरणार्थ - झालेल्या मतदानातील 2 हजार 493 मतपत्रिका अवैध ठरल्यास उरलेल्या 1 लाख मतपत्रिका वैध असतील. एक लाखाच्या निम्मे 50 हजार होतात. त्याहून एक अधिक म्हणजेच कोटा हा 50,001 मतांचा असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.