आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळ्यात वन्यप्राणी भूक कशीही भागवितात. मात्र, पाण्याशिवाय त्यांचे भागत नाही. कारण त्यांना जमीन खोदून त्यातून पाणी काढता येत नाही. पाणी मिळाले नाही की, तहान भागवण्यासाठी ते मनुष्य वस्तीकडे वळतात. यात वन्यप्राणी-मनुष्य संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता असते. नेमकी हीच बाब गृहित धरून वन विभागाच्या चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वन्य जिवांच्या तृष्णा तृप्तीसाठी सात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेत वन्यजीव येथे येऊन पाणी पितात व तहान भागवतात. पूर्वीच्या तुलनेत या सातही पाणवठ्यांमुळे येथे सुमारे ३० टक्के प्राणी व पक्ष्यांचा वावर वाढला आहे. तशा नोंदीही प्राणिमित्रांनी घेतल्या आहेत.
चांदूर रेल्वे रेंजमध्ये सात पाणवठे आहेत. यात १० मी. व्यासाचे दोन मोठे पाणवठे हे सिमेंट काँक्रीटने बांधण्यात आले असून तेथे जवळच्याच विहिरीतून जलवाहिनीद्वारे साडेसात अश्वशक्तीच्या पंपाने पाणी भरले जाते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात वन्यजीव, पक्ष्यांना पाणी मिळत नाही म्हणून ६ मी. व्यासाचे खड्डे खोदून आणखी पाच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. खड्डे खोदल्यानंतर त्यात गवत टाकून त्यावर जाड पाॅलिशीट टाकण्यात आली. त्याच्या आत गोटे, रेती टाकून नंतर ते दररोज टँकरच्या पाण्याने भरले जात आहेत. त्यामुळे या रेंजमधील प्राणी, पक्ष्यांची तहान भागत आहे. येथे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे चित्र टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत.
त्यातही अनेक प्राणी पाणी पिताना दिसतात. उन्हाळ्याचे चार महिने वनातील नाले, नद्या, झरे, विहिरी आटतात. एरवी याच नैसर्गिक जलस्रोतातील पाण्यामुळे त्यांची तहान भागते. ते मनुष्यासारखे सतत पाणी पित नाहीत. तर सकाळी व सायंकाळी दोनदाच पाणी पितात. मनुष्य पाणी मिळवण्यासाठी बोअर करतात. जमीन खोदतात. परंतु, प्राण्यांना तसे करता येत नाही. पाण्याशिवाय त्यांचे भागत नाही. मग पाण्याच्या शोधात वनांना लागून असलेल्या गावांमध्ये जातात. त्यावेळी मनुष्य-प्राणी संघर्ष निर्माण होतो. तो टाळण्याचाच आम्ही प्रयत्न केला आहे, असे वन विभागाच्या चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सांगितले. शाकाहारी प्राणी : हरिण, नीलगायी, रानडुक्कर, चितळ, मोर, ससा, सायाळ. मांसाहारी प्राणी : बिबट, तडस, मुंगूस, रानमांजर.
पूर्वी उन्हाळ्यात प्राण्यांचा वावर नसायचा
चांदूर रेल्वे हे वनक्षेत्र राखीव जंगलात मोडत नाही. त्यामुळे तेथे वन्यजीवांचा फारसा आढळ नसायचा. परंतु, अलिकडच्या काही वर्षांत येथेही वन्यजीवांचा आढळ मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. पहिल्यांदाच तेथे वन्यजीव व पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.