आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील महिलांना पाच रुपयात आठ सॅनिटरी पॅड देणारी अस्मिता योजना सध्या बंद आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांच्या आरोग्यविषयक हा महत्वाचा मुद्दा आमदार सुलभा खोडके यांनी विधीमंडळात उपस्थित केला. दरम्यान, एका महिन्यात अस्मिता योजना सुरू करण्याची मागणी यावेळी आमदार खोडके यांनी केली आहे. महिलांना तसेच शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकीन अभावी आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे याबत जनजागृती करून अल्प दरात महिलांना व मुलींना सॅनिटरी नॅपकिन विकत घेणे शक्य व्हावे, या दृष्टीकोनातून राज्यातील महिलांसाठी पाच रुपयात आठ सॅनिटरी पॅड देणारी अस्मिता योजना तत्कालीन सरकारने २०१८ मध्ये सुरू केली होती.
सदर योजनेत वर्ष २०१९ मध्ये ५० हजार बचत गटांनी विक्रीसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी जवळपास ४५ हजार बचत गटांना ऑर्डरही मिळाल्या होत्या. परंतू एप्रिल २०२२ पासून कंत्राट संपल्याने सदर योजनेची अंमलबजावणी राज्यात बंद आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. शासनाकडे अस्मिता योजनेचा सुधारित प्रस्ताव प्रलंबित असून, याबाबत अंमलबजावणी कधी होणार? असा प्रश्न आमदार सुलभा खोडके यांनी उपस्थित केला. अस्मिता योजना सुरु करण्याबाबत महिलांवर्गाकडून मोठया प्रमाणात मागणी होत असल्याने या योजनेच्या सुधारित प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्यावी. तसेच योजना सुरू करण्यासाठी विलंब का होतो याबाबत त्यांनी स्पष्टीकरण मागितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.