आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात तत्काळ, तात्पुरती विजजोडणी मिळेल:दर घरगुतीचे, अधिकृत वीजजोडणी घ्या, गणेश मंडळांना महावितरणचे आवाहन

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. मंडळांकडून मागणी झाल्यानंतर आवश्यक प्रक्रीया पुर्ण करताच तत्काळ विजजोडणी देण्यात येणार आहे. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या 100 युनिटसाठी केवळ 4 रूपये 71 पैसे प्रति युनिट, 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रति युनिट, 301 ते 500 प्रती युनिट वीज वापरासाठी 11 रुपये 72 पैसे प्रति युनिट आणि 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही, घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिनी व रोहित्रांचा गणेश उत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून प्राणांतिक अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

तक्रारींसाठी येथे करा संपर्क

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

100 मीटर राखीव ठेवले आहेत

शहरी भागातील सार्वजनिक गणेश मंडळांनी विज जोडणीबाबत अर्ज करुन आवश्यक प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर तत्काळ विजजोडणी देण्यात येईल. गणेशोत्सवासाठी आम्ही १०० मीटर राखीव ठेवले असून गरज भासल्यास आणखी मीटर उपलब्ध करुन देवू. -आनंद काटकर,कार्यकारी अभियंता.

बातम्या आणखी आहेत...