आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंजनगाव सुर्जी शहरातील गणेश नगर येथे गेल्या तीन वर्षांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि. 6) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर होळी पेटवली, तसेच कार्यालयात कोणताही अधिकारी हजर नसल्याने अधिकाऱ्याच्या कार्यालयाला चोळी बांगड्यांचा आहेर करीत निषेध व्यक्त केला. आता तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागरिकांच्या पाणी प्रश्नाची दखल घेईल काय, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहरातील गणेश नगर, संगाई प्लॉट, बहिरे प्लॉट, रोकडे प्लॉट, वसुंधरा कॉलनी येथील नागरिक गेल्या तीन वर्षांपासून जीवन प्राधिकरणचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून निवेदने व अर्ज देत आलेले आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना मोटर लावून पाणी वर चढवावे लागते. त्यामुळे नाहक पाणीपुरवठ्याच्या बिलासोबतच इलेक्ट्रिकचे बिल सुद्धा भरावे लागत असून हा दुहेरी आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. पाण्याची टाकी सुरू होऊन सहा महिने उलटले, तरीही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी मजिप्रासमोर होळी पेटवून निषेध व्यक्त केला.
या वेळी निवेदन स्वीकारायला एकही अभियंता किंवा अधिकारी हजर नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंत्याच्या दाराला निवेदन चिपकवून दरवाज्यालाच चोळी-बांगडीचा आहेर केला. या वेळी निषेध व्यक्त करताना प्रशांत कोल्हे, तीर्थराज बिजेवार, प्रमोद राऊत, रमेश तायडे, माया मानकर, भाऊराव साबळे, जानराव काळे, अमोल कावरे, प्रदीप ढाबे, नितीन काळे, प्रवीण बोके, प्रवीण कोल्हे, सुरेश कुकडे, नितीन काळे, विलास बारबदे, विलास शिंगणे, गणेश बुंदिले, तेजस काळमेघ, नरेद्र राऊत, अनिकेत काळे, रामभाऊ काकड, जयेश राऊत, उज्वल काकड, सुरेश राऊत, घनश्याम डिके, यश मानकर, यश डिके, प्रणव कोल्हे, दिनेश राऊत, पियुष कोल्हे, राम देशमुख, राजू बारब्दे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.