आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धांना गंडा:मास्क का लावले नाही, विचारत दोन वृद्धांना गंडा

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्ही साहेब आहाेत, तुम्ही विना मास्क का फिरत आहात, हे योग्य नाही, तुम्हाला गाडीत बसवायचे का? तसेच तुमच्याजवळ गांजा आहे का? अशी दमदाटी करून दोन वृद्धांना ३५ हजार ५०० रुपयांनी लुटण्यात आले. पहिली घटना शहरातील रेल्वे स्टेशन ते बसस्थानक मार्गावर तर दुसरी घटना रेल्वे स्टेशन मार्गावरील साई मंदिराजवळ शनिवारी दुपारी १२ ते २ च्या सुमारास घडल्या आहेत.

देवराव मारोतराव सदार (६५ रा. तिवसा) आणि विठ्ठलराव रघुजी मावरे (६७, रा. एलकी पूर्णा, ता. अचलपूर) असे फसवणूक झालेल्या वृद्धांची नावे आहेत. देवराव सदार हे शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास बसस्थानकावरून पायी खापर्डे बगीचातील एका रुग्णालयात येत होते. त्या ठिकाणी त्यांच्या नातूवर उपचार सुरू अाहेत. याचवेळी मार्गात त्यांना एका व्यक्तीने अडवून तुम्ही मास्क का लावला नाही. आम्ही साहेब आहे, तुम्हाला आता गाडीत बसवावे लागेल. त्यानंतर या लूटारूने सदार यांचे खिसे तपासले. यावेळी त्यांच्या खिशात सोन्याच्या दोन अंगठ्या व पैसे होते, ते काढले. हे सर्व पिशवीत ठेवा, असे सांगून त्याने पिशवीत ठेवले. त्याचवेळी सदार यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली तर या लूटारुने त्यांना पिशवी परत केली मात्र ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरीने नेली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

तसेच दुसरी घटना रेल्वे स्टेशन ते इर्विन मार्गावरील साई मंदिरासमोर घडली. विठ्ठलराव मावरे दुचाकीची किस्त भरण्यासाठी पायी रेल्वे स्टेशनकडे येत असताना त्यांना एका लूटारुने अडवले व मास्क का लावले नाही. आम्ही अधिकारी आहे, तुमच्या खिशात गांजा आहे का, अशी विचारणा करून त्यांच्या खिशाची तपासणी केली. यावेळी मावरे यांच्या खिशात ९५०० रुपये होते. ती रक्कम घेऊन तो लूटारू पसार झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...