आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:सीपी कार्यालयात कीटकनाशक घेऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; विष घेणाऱ्या या व्यक्तिविरुध्द खोलापुरी गेट पोलिसांत विनयभंगाचे काही महिन्यांपूर्वी दोन गुन्हे दाखल

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पार्वतीनगरमध्ये राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने शनिवारी (दि. ७) सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास पोलिस आयुक्त कार्यालयातील अभ्यागत नोंदणी टेबलसमोर विष (किटकनाशक) घेतले. मात्र हा प्रकार उपस्थित पोलिसांना लक्षात येताच त्यांनी या व्यक्तीजवळील बाटली हिसकावून घेत त्याला तत्काळ इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विष घेणाऱ्या या व्यक्तिविरुध्द खोलापुरी गेट पोलिसांत विनयभंगाचे काही महिन्यांपूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. प्रविण किसनराव राजूरकर (४५, रा. पार्वतीनगर क्रमांक २) असे विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. शनिवारी शासकिय सुटी असल्यामुळे पोलिस आयुक्त कार्यालयात दररोजच्या तुलनेत वर्दळ कमी होती. दरम्यान सकाळी ११ वाजून २८ मिनिटांनी राजूरकर सीपी ऑफिसमधील अभ्यागत नोंदणी टेबलसमोर पोहोचले व त्यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना नाव विचारले व तशी नोंदणी केली.

त्यानंतर अवघ्या काही क्षणातच राजूरकरने खिशात असलेली कीटकनाशकाची बॉटल काढली व तोंडाला लावली. यावेळी त्याच ठिकाणच्या पोलिसांनी तत्काळ ती बॉटल त्यांच्याकडून हिसकावून घेतली व रुग्णालयात दाखल केले होते. राजूरकरची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रविण राजूरकर विरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रविण राजूरकर विरुध्द परिसरातील दोन महिलांच्या तक्रारीवरून विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल असल्याचे खोलापुरी गेटचे ठाणेदार गजानन तामटे यांनी सांगितले आहे.

दरम्यान त्या तक्रारदार महिलांपैकीच एका महिलेविरुद्ध माझ्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजुरकरने केली आहे. मात्र पोलिस आपली तक्रार घेवून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करत नाही, म्हणून शनिवारी आपण पोलिस आयुक्तांना हा प्रकार सांगण्यासाठी गेलो, असल्याचे राजूरकरने सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...