आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Attempting To Collect Subscriptions And Pay The Mahadistribution For The Purchase Of Meters; Not Only The Meter, But How About The Bill? | Marathi News

संताप:वर्गणी गोळा करून महावितरणाला मीटर खरेदीसाठी पैसे देण्याचा प्रयत्न ; मीटरच नही, तर बिल कसे?

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणच्या वतीने शहरातील वडाळी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला मीटर नसताना सोळाशे रुपयांचे वीज बिल देण्यात आले. घरी वीज मीटर नसताना आलेले वीज बिल पाहून त्या व्यक्तीला धक्काच बसला आहे. मीटरच नाही, तर मग महावितरणने कोणत्या आधारावर वीज बिल दिले, असा प्रश्न प्रहारने उपस्थित केला. या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार उघड झाला असल्याचे प्रहारचे म्हणणे आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून वीज मीटरसाठी ५० ते ६० कुटुंब महावितरणकडे चकरा मारत आहेत. मात्र, मीटर उपलब्ध नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत असल्याचा आरोप या लाभार्थ्यांनी केला. सोमवारी या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने महावितरण कार्यालयावर लाभार्थ्यांसोबत धडक दिली. दरम्यान लाभार्थ्यांनी स्वतः वर्गणी गोळा करून ती गोळा केलेली वर्गणी संबधित अधिकाऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. या पैशातून मीटर खरेदी करा, मात्र, लाभार्थ्यांना मीटर द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रहारने निवेदनात म्हटले, की महावितरणकडून ज्या नागरिकांना मीटरच नाही, अशांनाही वीज बिल दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वडाळी परिसरातील रवींद्र डोंगरे यांना महावितरणकडून १६१० रुपयांचे वीज बिल देण्यात आले. रवींद्र डोंगरे यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी महावितरणकडे मीटरसाठी अर्ज केला होता. यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी मीटरसाठी आवश्यक रक्कमही महावितरणकडे भरली. परंतु अद्याप महावितरणकडून त्यांना मीटर मिळालेले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बिच्छू टेकडी परिसरातील शासकीय जागेवर ५० ते ६० कुटुंब वास्तव्य करत आहेत. गेल्या एक वर्षांपासून या भागात वीज नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून बसावे लागते आहे. पावसाळ्याच्या दिवसात सरपटणारे आणि वन्य प्राण्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. बिच्छू टेकडी येथील एमएसईबी कार्यालयात मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली आहे. तरीही नागरिकांना विजेपासून वंचित ठेवताहेत. त्यामुळे हा महावितरणचा लाभार्थी कुटुंबीयांवर अन्याय असल्याचे प्रहारचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना घेऊन सोमवारी प्रहारने महावितरण कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता खानंदे यांच्या दालनात ठिय्या दिला. या वेळी खानंदे यांनी सर्व बाजू समजून घेतली. त्यानंतर यावर लवकरच तोडगा काढू, असे खानंदे यांनी सांगितले.

या वेळी महानगर प्रमुख बंटी रामटेके, शहर संपर्क प्रमुख गोलू पाटील, जिल्हा महासचिव शेख अकबर, शेषराव धुळे, शहर उपप्रमुख श्याम इंगळे, अभिजित गोंडाणे, मंगेश कविटकर, युवक आघाडी श्याम कथे, उमेश मेश्राम, रोशन देशमुख, रावसाहेब गोंडाणे, ऋषभ मोहोड, विक्रम जाधव, अजय तायडे, कुणाल खंडारे यांच्यासह सुलभा तेलमोरे, नीता इंगळे, पंचशीला जवंजाळ, कविता भुसुम, साधना गवई, रेश्मा मोहोड, ज्योती इंगळे, रेश्मा वाकोडे आदी उपस्थित होते.

चौकशीअंती कारवाई करू
चुकीच्या ग्राहकाला वीज बिल देण्यात आल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार संबंधितांची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल. लाभार्थ्याला मीटरही बसवून मिळेल. तसेच वीटभट्टी परिसरातील नागरिकांना लवकरच वीज मीटर देण्यात येईल. त्या जागेचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे लाभार्थ्यांनी न्यायालयाकडून पत्र आणावे, त्यानंतर लगेच मीटर मिळेल.
- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता.

बातम्या आणखी आहेत...