आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरून जुन्या रहाटगाव रस्त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा वळण मार्ग (नवीन बायपास) आहे. या नव्या मार्गामुळे जुना महसुली रस्ता अडगळीत पडला आहे. मुळात या भागातील वेगवेगळ्या १४ कॉलनी व वसाहतींमधील नागरिकांच्या दळवळणासाठी तोच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्ती व वस्त्यांमधील इतर नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील नागरिकांनी २० डिसेंबरला दुपारी १२ वाजता विद्यापीठ चौकात लक्षवेध आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनानंतरही मनपा प्रशासनाने दखल घेतली नाही तर भविष्यात मनपा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा नागरिकांचा संकल्प आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर विद्यापीठ चौकात उड्डाणपूल (ओवर ब्रीज) आहे. दुसऱ्या बाजूने रहाटगावपर्यंत ना रस्ता, ना लाईट, ना पाऊलवाट अशी स्थिती आहे. त्यामुळे या वस्त्यांमधील नागरिकांना अक्षरशः कोंडून ठेवले आहे. शिवाय वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते, नाल्यांचाही विकास झाला नाही. केवळ मनपा कर वसुलीचे काम करते. सुचवलेली कामे मात्र प्रलंबित आहेत.
यावरून मनपाचा या भागासाठी विकास आराखडाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंत्रणेविरोधात हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाची पूर्वसूचना मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. आंदोलनाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करून आदरांजली दिली जाईल. त्यानंतर सर्व चौदाही वस्त्यांमधील नागरिकांच्या सहभागाने शांततेच्या मार्गाने लक्षवेध आंदोलन केले जाईल. या आंदोलनात तेथील रहिवासी प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, जगदीश आत्राम, अमित गावंडे, राजेश इंगळेकर, गोपाळराव वर्धे, संजय अगमे, संतोष भाकरे, अशोकराव सोनारकर, बाळासाहेब गावंडे, नीलेश चौधरी, सुंदरलाल बुंदेले, रोशन कुटेमाटे, अॅड. शरद ढोके, मंगेश वाहने, अशोकराव वानखडे, कवीश बागेकर, महादेवराव लोखंडे आदी सहभागी होणार असून, इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
वस्त्या आहेत, पण नागरी सुविधा नाहीत
अलिकडच्या काळात बायपास लगतच्या परिसरात झपाट्याने निवासी वस्त्या तयार झाल्या. मधुबन कॉलनी ते अजमिरे लेआऊटच्या मध्ये तब्बल १४ वस्त्या आहेत. या परिसरात विद्यापीठात शिकणाऱ्या मुला- मुलींसह, मार्डी रोडवरील सर्व संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रामुख्याने वास्तव्य आहे. रात्री उशिरापर्यंत या मार्गावर ये-जा सुरू असते. त्या रस्त्यावर पक्की सडक बांधली नाही, पथदिवे उभारणीही अर्ध्यावर आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.