आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअचलपुर तालुक्यातील महसूल यंत्रणेने जप्त केलेल्या वाळू साठ्याच्या लिलाव आगामी ६ जानेवारी रोजी केला जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून अचलपुरच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात ते सादर करावयाचे आहेत.
जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या साठ्याची अपसेट प्राईज प्रति ब्रास 600 रुपये याप्रमाणे 9 लाख 78 हजार घोषित करण्यात आली आहे. दरम्यान त्याहून अधिक बोली लावताना ज्याची रक्कम सर्वोच्च असेल तो त्या साठ्याचा मालक होईल.
बोली लावण्याची ही प्रक्रिया अचलपुरच्या एसडीओ कार्यालयात 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुरु करण्यात येणार आहे. जप्त वाळू साठा मौजा भुगांव ता. अचलपूर जि. अमरावती येथील गट नं 334 येथील वासणी मध्यम प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रातील पिली नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणातील वाळूचा आहे.
अंदाजे 1 हजार 630 ब्रास एवढा हा साठा असून उपविभागीय व तालुकास्तरीय विशेष पथकामार्फत केलेल्या कार्यवाहीदरम्यान तो जप्त करण्यात आला आहे. जाहीर लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्ती, संस्था व शासकीय विभाग यांना अर्जासोबत ई-मेल आयडी, पॅनकार्ड, जीएसटी नंबर, करारपत्रक, रहिवासी पुरावा व आयकर भरणा करत असल्याचा पुरावा इत्यादी दस्ताऐवज सादर करावे लागतील.
इसारा रक्कम व इतर सर्व रकमा धनादेशाव्दारे भराव्या लागतील. लिलावात सर्वोच्च बोली ज्यांच्या नावे मंजूर होईल, त्यांना मंजूर रकमेवर शासन निर्णयानुसार आयकर 2 टक्के जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी (लिलाव रकमेच्या 10 टक्के) विहित मुद्रांक शुल्क, भुपृष्ठ भाडे भरावे लागेल.
दंडाची रक्कमही वसुल करणार
दरम्यान ज्यांच्याकडून सदर वाळूसाठी जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून दंडही स्वीकारला जाणार असल्याचे महसूल खात्याने स्पष्ट केले आहे. बनावट रॉयल्टी पासेस, अवैध उत्खनन, चुकीच्या वाहनांचा वापर आदी कारणांमुळे ही वाळू जप्त करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधितांविरोधात आधीच दोषारोप सिद्ध झाले असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.