आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:ऑटोरिक्षाची दुभाजकाला धडक; 1 ठार, 2 जखमी ; बडनेरा ते अमरावती महामार्गा वरील घटना

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी ऑटोला बडनेरा ते अमरावती एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला. या वेळी प्रवासी ऑटो एका वळणावर थेट दुभाजकाला धडकला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला, तर दोन मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी झाला आहे. धीरज सुनील चतुर (२८, रा. इंझा ता. कारंजा लाड, वाशीम) असे मृतक ऑटोचालकाचे तर नीलेश धारसे आणि मनीष शेमुरकर (दोघेही, रा. मध्य प्रदेश) असे जखमींचे नावे आहेत. धीरज चतुर यांच्या प्रवासी ऑटोत ते कारंजा लाड भागातून सात मजुरांना घेऊन मक्रमपूर येथे जात होते. सदर प्रवासी ऑटो बडनेरा ते अमरावती एक्स्प्रेस हायवेवरील संकेत कॉलनीजवळ आला असता वळणावर चालकाला ऑटो अनियंत्रित झाला व रस्ता दुभाजकावर धडकला. यावेळी ऑटो सुमारे २० फूट दुभाजकाला घासतच थेट दीड फूट उंचीच्या दुभाजकावर चढला. या वेळी ऑटोमधील प्रवासी खाली व चालकाच्या अंगावर फेकल्या गेलेत. यामध्ये धीरज चतुरसह इतरांना तातडीने इर्विन रुग्णालयात पोहोचवले. उपचारादरम्यान धीरज चतुर यांचा मृत्यू झाला, तर नीलेश व मनीष यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच गाडगे नगरचे उपनिरीक्षक सचिन माकोडे त्यांच्या पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

ऑटोत दिसली ब्रेकखाली बॉटल असलेले पिशवी अपघातानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. यावेळी ऑटोचा चुराडा झाला होता. तसेच ऑटोच्या ब्रेकखाली पाण्याची बॉटल असलेली पिशवी दिसली आहे. ही बॉटलची पिशवी अपघातापूर्वी पडली की अपघातानंतर याबाबत अद्याप स्पष्टपणे पोलिसांनाही माहिती मिळाली नाही. मात्र अपघातापूर्वी ही पिशवी ब्रेकखाली आली असेल, नेमके त्याचवेळी वळण आल्यामुळे चालकाने ब्रेक दाबले परंतु बॉटलमुळे पूर्ण क्षमतेने ब्रेक लागले नाही व ऑटो अनियंत्रित होऊन दुभाजकावर धडकला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस सखोल चौकशी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...