आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन:आझाद हिंद घडवणार 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

\अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ९५ वर्षांची उज्वल परंपरा असलेले बुधवारा येथील आझाद हिंद मंडळ यंदा बाप्पांच्या भक्तांना २५ फूट उंच भगवान शिवशंकराची मूर्ती व १२ ज्योतिर्लिंगांचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणार आहे.

१९२८ मध्ये राॅयल क्लब नावाने सुरू झालेल्या या मंडळाला कालांतराने नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे नाव देण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या मंडळाचा गणेशोत्सव अतिशय देखणा तसेच भाविकांना सतत काहीतरी नवे दर्शन घडवणारा राहिला आहे. येथे राज्यासह देशभरातील कलावंतांनी विविध देखावे तयार केले आहेत. यंदाही दिल्लीतील गणराज्यदिन परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करणारे शिवा प्रजापती यांनी दक्षिण भारतीय मंदिरातील मोठा नंदी, १२ ज्योतिर्लिंग आणि कलोती सभागृहाच्या प्रवेश द्वाराजवळ २५ फूट उंच महादेवाची देखणी मूर्ती तयार केली आहे.

मंडळाने याआधी अनेक भव्यदिव्य देखावे तयार केले. त्यात स्व. सोमेश्वर पुसतकर यांच्या कल्पनेतून लाल किल्ला, ताजमहाल, अक्षरधाम मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर, कन्याकुमारी, विदर्भातील प्रसिद्ध लासूर मंदिर, पद्मनाभ स्वामी मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, पंढरपूर वारीचा देखावा यासह सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांवर देखावे साकारण्यात आल्याची माहिती माजी महापौर विलास इंगोले यांनी दिली.

मंडळाच्या गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, नाटिका, मराठी, हिंदी कविसंमेलन, व्याख्यान तसेच देशातील ज्वलंत विषयांवर वादविवाद अशा भरगच्च कार्यक्रमांची पर्वणी लाभली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे मर्यादित स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. परंतु, यंदा मात्र उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा गेल्या एक महिन्यापासून तयार केला जात आहे. तामिळनाडू येथील भगवान महादेवाची मूर्तीही साकारली जात आहे. श्री गणेशाची मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार गजानन सोनसळे यांनी तयार केली आहे.

पत्रपरिषदेला माजी खा. अनंत गुढे, प्रदीप वडनेरे, माजी महापौर विलास इंगोले, ज्येष्ठ कलावंत राजाभाऊ मोरे, प्रकाश संगेकर, डाॅ. संदीप दानखेडे, कैलाश पिरोडकर, शैलेश अग्रवाल, विवेक कलोती, लेखक किशोर फुले, संजय मुचळंबे, दिलीप कलोती, दिलीप दाभाडे, भूषण पुसतकर, संतोष बद्रे उपस्थित होते.

यंदाच्या गणेशोत्वात नेत्रदीपक विद्युत रोशनाई
अकोला येथील गुलाब डेकोरेशनद्वारे आकर्षक विद्युत रोशनाई केले जात असून यंदा उत्सवासाठी कोनलाडे मंडप काॅन्ट्रॅक्टर, गुप्ता डेकोरेशन, चौधरी डेकोरेशन यांनी सहकार्य केले आहे. ३१ रोजी दु.२ वाजता स्थापना शोभायात्र निघणार असून मुख्य बाजारपेठेतून परिक्रमा करून ती मंडळात परत येईल. त्यानंतर सायं. ७ वाजता शिवाच्या मूर्तीचे उद्घाटन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...