आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्राथमिक स्तरावर लोकसहभागातून 10 शाळांमध्ये बाला उपक्रम राबवणार

वैभव चिंचाळकर |अमरावती6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बिल्डींग अॅज ए लर्निंग एड’ (बाला) शाळेची इमारत हेच शिक्षणाचे साहित्य अर्थात बोलकी शाळा उपक्रम महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये राबवला जाणार असून प्राथमिक स्तरावर लोकसहभागातून १० शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्याचे ठरले होते. जेवड येथील शाळेने तर पालकांकडून पैसेही गोळा केले. त्यानंतर मनपा शिक्षण विभागाने सर्वच शाळांना या उपक्रमासाठी अंदाजित खर्चाचे प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहेत. त्यामुळे पालकांकडून किती सहकार्य मिळते तसेच मनपाला किती खर्च करावा लागेल, याचा अंदाज घेता येणार आहे.

शाळेचे छत, पिलर आणि भिंतींवर विविध शैक्षणिक विषयाशी संबंधित चित्रे रंगविली जातील. ही चित्र आकर्षक व ठळक असतील. शाळेच्या वाॅल कंपाऊंडच्या भिंतीपासून ते अगदी वर्ग खोल्यांपर्यंत विविध चित्रे, एबीसीडी, अक्षरमाला, वर्णमाला, फळे, झाडे, प्राणी,पक्षी, विज्ञानातील शोध, ग्रह, उपग्रह, तारे असे चित्राद्वारे रेखाटले जाईल. म्हणजे शाळेच्या भिंतीच आता विद्यार्थ्यांसोबत बोलतील. त्यांना मोठ्या चित्रांमधून लगेच कोणत्याही विषयाचा उलगडा होईल. समजण्यास सोपी अशी ही पद्धत आहे.

शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना समजावून सांगणे सुलभ जाईल. विद्यार्थी शाळेच्या भिंतीपासून बरेच काही शिकतील. त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. पुस्तकातील आकृत्या, चित्रांमधून सहज कळत नाही, त्या तुलनेत भिंतीवरील चित्रांमधून विद्यार्थ्यांना बोध घेता येईल. फळे, भाजीपाला, धान्य, कडधान्य, शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थ यांचा उलगडा करता येईल. यात पुस्तकांचा कमीत कमी वापर व्हावा, प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, हाच उद्देश आहे. चित्रे ही पक्क्या पेंट द्वारे काढली जातील, काही ठिकाणी सिरॅमिकचे वर्कही केले जाईल. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनाही कल्पनाशक्ती वापरण्यास प्रेरित केले जाईल.

शाळेची इमारत हीच शिक्षणाचे साधन : बाला उपक्रमात शाळेच्या इमारतीलाच शिक्षणाचे साधन बनवण्यात आले आहे. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने ग्रह तारे प्रत्यक्ष कसे असतील ते दाखविता येणार नाही. मात्र भिंतीवर जर सूर्यमालेचे चित्र असेल तर विद्यार्थ्यांना तत्काळ सूर्यमालेतील ग्रह किती, त्यांचा रंग कोणता, आकार किती मोठा, लहान याची माहिती मिळणार आहे.

शाळांना प्रस्ताव मागितले
काही शाळांनी काम सुरू केले होते. त्यांनी पालकांकडूनही बाला उपक्रमासाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बैठक घेऊन आम्ही शाळांना प्रस्ताव मागितले. सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबवणार आहोत. -डाॅ. अब्दुल राजीक, शिक्षणाधिकारी, मनपा.

बातम्या आणखी आहेत...