आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्यांचाही पोळा:बळीराजाने वाजत-गाजत आणले बैल ; पारितोषिकांची झाली लयलूट

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैलपोळा, नंदी पोळा ही शेतकऱ्याची संस्कृती, परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या सोबत रात्रंदिवस शेतात राबणारा, शेतातील सगळी कामे करणाऱ्या सर्जा-राजाचा सण म्हणजे बैलपोळा व तान्हा पोळा जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी शहरासह जिल्ह्यात उत्साह, जल्लोष व आनंदात साजरा करण्यात आला. बळीराजाने वाजत-गाजत बैलांना गावातील तोरणांखाली आणले, तर तान्ह्या पोळ्यात विविध रंगी माती व लाकडापासून बनवलेले तसेच आकर्षक सजावट केलेल्या बैलांसह चिमुकल्यांच्या वेशभूषेने लक्ष वेधून घेतले. या वेळी झालेल्या स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसांची लयलूट करण्यात आली.

चांदूर रेल्वेत बैलपोळा व तान्हा पोळा उत्साहात
शहरातील गोवर्धन चौक, शिवाजी नगर, संताबाई यादव नगर, महादेव घाट, इंदिरा नगरसह तालुक्यातील प्रत्येक गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाकात घातलेली नवीन वेसन, नवीन घुंगर माळा, झूल वेगवेगळ्या प्रकारचे हिंगुळ लावलेले बैलांचे शिंग लक्ष वेधून घेत होते, तर दुसरीकडे तान्ह्या पोळ्याने चिमुकल्यांच्या मनात मोठा उत्साह जागवला होता. खडकपुरा येथील गोवर्धन चौक, महादेव घाट परिसर, शिवाजी नगर व इंदिरा नगरातील महारुद्र हनुमान मंदिराच्या पटांगणात तान्हा पोळा साजरा करण्यात आला. लहान मुलांना आयोजकांतर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तान्हा पोळा व बाल उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी चौकात तान्हा पोळा; बालगोपालांना बक्षीस वितरण
तालुक्यातील गुरुदेवनगर येथील शिवाजी चौकात आयोजित तान्ह्या पोळ्याच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार संदीप चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अर्चना खारोडे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे नीळकंठ हळदे, उपसरपंच संदीप बारमासे, सदस्य अनिल डिक्कर, कपिल उमप, हेमंत निखाडे, आकाश महाराज, पुंडलिक खारोडे, श्रीधर कुंभलकर आदी उपस्थित होते. या वेळी नीळकंठ हळदे यांनी आज संस्कारक्षम पिढी निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेची शिकवण व त्यातील विचारांचे पालन करणे गरजेचे आहे. तान्हा पोळ्याच्या माध्यमातून संस्कार शोधन परंपरा कायम ठेवून या बालगोपाळांना छत्रपती शिवाजी महाराज सारखे शूरवीर घडवण्याची जबाबदारी पालकाची असल्याचे मत व्यक्त केले. या प्रसंगी हस्तकलेतून बाल गोपालांनी साकारलेल्या मातीच्या बैलांचे कौतुक करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन करून जयंत निखाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी शिवाजी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

भवानी चौकात तान्हा पोळा
शहरात भरलेल्या तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी सहभागी होत आनंद घेतला. त्यांनी हस्तकलेतून वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे बैल तयार करत पोळ्यात सहभाग नोंदवला. सहभागी सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी उपस्थित विलास गौरखेडे, अंकुश देशमुख, हेमंत गौरखेडे, कुणाल गौरखेडे, महेश कोकाटे, अरुण बेलसरे, संजय गौरखेडे, भूषण गौरखेडे, भाग्येश गौरखेडे, ऋतिक देशमुख, सूरज गौरखेडे, यश गौरखेडे, प्रथमेश गौरखेडे, दर्पण रोडगे, दिनेश लोहकरे, समर्थ जिकाटे, पीयूष राहाने, ओम गौरखेडे, रुद्र बाभुळकर, निशू बेलसरे, अथर्व बेलसरे, साहिल वाट, मयूर धानोरकर, शिवजित देशमुख, स्वरीत गौरखेडे आदी उपस्थित होते.

करजगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भरला तान्हा पोळा
तालुक्यातील करजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा धारण करून आयोजित तान्हा पोळ्यात सहभाग घेतला होता. त्यानिमित्ताने एक आगळावेगळा पोळा भरवण्यात आला. जि. प. प्राथमिक शाळा करजगाव येथे तान्हा पोळ्याचे औचित्य साधून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. मातीपासून तयार केलेल्या बैलांची सजावट स्पर्धा, मराठमोळी वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले. सर्व विद्यार्थ्यांनी मातीपासून बैल तयार करून ते तान्हा पोळ्यात आणले होते. विजेत्यांना मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षक अविनाश गंजीवाले यांनी विद्यार्थ्यांना पोळा सणाचे महत्त्व पटवून दिले.

हिवरखेड येथे बैलजोडी स्पर्धा; विजेत्यांना पुरस्काराचे वितरण
हिवरखेड येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व जय बजरंग क्रीडा मंडळाच्या सहकार्याने बैल जोडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये तोरणाखाली आलेल्या २०० बैलजोडींपैकी ३६ बैल जोडींची स्पर्धेसाठी निवड केली. त्यात अजय पवार, सुरेश नेहारे, योगेश धोटे व राहुल शिरभाते यांनी अनुक्रमे पहिले चार क्रमांक पटकावले. या वेळी बैलजोड्यांसह शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जि. प. माजी सदस्य हरीभाऊ सुखसोहळे, बाबासाहेब धरमकर, नीलेश शिरभाते, मोहन पाचारे, नंदकिशोर गांधी, दत्तात्रय गेडाम आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...