आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयद्रावक:शिंदी येथे फुग्यात हवा भरण्याच्या सिलिंडरचा स्फोट; चिमुकलीचा मृत्यू

अमरावती / परतवाडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथे तान्हा पोळ्यानिमित्त छोटेखानी यात्रा भरते. यावेळी काही खेळण्यांची दुकाने सुद्धा लागतात. दरम्यान शनिवारी (दि. २७) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातीलच एक २० महिन्यांची चिमुकली तिच्या आजोबांसोबत यात्रेत गेली होती. या वेळी फुगा घेत असताना चिमुकली व तिचे आजोबा फुगे विक्रेत्याच्या बाजूने उभे असताना फुग्यात भरण्यासाठी वापरात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला, तर आजोबा गंभीर जखमी झालेत. गॅस भरलेले सिलिंडर तब्बल १७ वर्ष जुने असून ते गंजलेले असल्यामुळेच त्याचा स्फोट झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

परी ऊर्फ भार्गवी सागर रोही (२० महिने) असे मृतक चिमुकलीचे, तर रवींद्र किसनराव रोही (५५) असे गंभीर जखमी झालेल्या परीच्या आजोबांचे नाव आहे. तान्हा पोळ्याच्या दिवशी सायंकाळी रवींद्र रोही हे त्यांच्या नातीला घेऊन जत्रेत आले होते. परीला फुगा घेऊन देण्यासाठी ते फुगे विक्रेत्याजवळ आले. त्याचवेळी गॅस सिलिंडर फुटले व सिलिंडरचा एक तुकडा परीच्या पायात घुसला व तिच्या पायातून रक्तस्राव सुरू झाला. रवींद्रसुद्धा गंभीर जखमी झाले. नागरिकांनी या दोघांनाही परतवाडा येथील रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्रावाने परीचा काही वेळातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर रवींद्र रोही यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पथ्रोटचे ठाणेदार सचिन जाधव पथकासह घटनास्थळी पोहाेचले होते.

या प्रकरणात फुगे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध घेत २८ ऑगस्टला दुपारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. बिस्मिल्ला शहा वजीर शहा (४२, रा. रायपुरा, अचलपूर) असे त्या फुगे विक्रेत्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.फुग्यात ‘जुगाड’ पद्धतीने तयार केलेला गॅस : हवेत उडणाऱ्या फुग्यात हेलियम गॅसचा वापर केला जातो. कारण हेलियम गॅस हा ऑक्सिजनपेक्षा हलका असल्यामुळे तो फुगा हवेत उडतो. मात्र शिंदी येथे स्फोट झालेल्या सिलिंडरमध्ये तयार केलेला गॅस हा अवैधपणे जुगाड पद्धतीने तयार केला असल्याचे समोर येत आहे. दीड लिटर पाण्यात कॉस्टिक सोडा आणि लोखंडाचा चुरा मिसळवून तयार होणाऱ्या केमिकल रिअॅक्शनमधून हा गॅस तयार झाला होता. हा गॅस ज्या सिलिंडरमध्ये भरला होता, ते सिलिंडर १७ वर्ष जुने होते. त्यामुळे सिलिंडरचा खालचा भाग गंजलेला होता. यातच तयार झालेल्या गॅसचे प्रेशर जास्त झाले असावे, त्यामुळे सिलिंडर खालच्या बाजूने फुटले आणि स्फोट झाला असावा, असे फुगे विक्रेत्याच्या प्राथमिक तपासातून समोर आल्याचे ठाणेदार सचिन जाधव यांनी सांगितले आहे. या प्रकरणात आम्ही फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेणार असून नेमका गॅस कोणता होता, त्याचा स्फोट का झाला, ही माहिती त्यांच्याकडून घेणार असल्याचेही एपीआय जाधव यांनी सांगितले.

यात्रेत गॅस सिलिंडर दिसल्यास जप्त करा
आगामी काळात जिल्ह्यात कुठेही, कोणत्याही यात्रेत गॅसचे फुगे विक्री करताना विक्रेता आढळल्यास त्याच्याकडून सिलिंडर जप्त करण्यात येईल. तसे आदेश सर्व ठाणेदारांना दिले. तसेच गावात गॅसचे फुगेविक्रेता दिसल्यास व त्याच्याकडे सिलिंडर असेल तर तत्काळ संबंधित पोलिसांना माहिती द्यावी, असे पत्र सर्व पोलिस पाटील यांना देत आहोत.
अविनाश बारगळ, पोलिस अधीक्षक.

कॉस्टिक सोड्यामुळे सिलिंडरचा पृष्ठभाग जळून पातळ झाल्याने स्फाेट कॉस्टिक सोडा, लोखंडाचा चुरा आणि पाण्याच्या मिश्रणातून हायड्रोजन वायू तयार होतो. हा वायू हवेपेक्षा हलका व ज्वलनशील असतो. मुळात या तिन्ही घटकांमध्ये एक विशिष्ट रासायनिक प्रक्रिया जन्माला येते. त्यातूनच हा वायू तयार होतो. कॉस्टिक सोड्यामुळे लोखंडाची झीज होते. शिवाय लोखंडाचा चुरादेखील सिलिंडरच्या आतील पृष्ठभागाची झीज करतो. त्यामुळे सिलिंडरचा एकूण पृष्ठभाग आतल्या आत घासून पातळ होतो. कदाचित त्यामुळेच स्फोट होऊन वायू बाहेर पडला असावा. डॉ. राजेंद्र प्रसाद, विभाग प्रमुख, रसायनशास्त्र विभाग, संगाबा विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...