आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो वर्षाची परंपरा कायम:17 तासांपेक्षा अधिककाळ चालली बाप्पांची विसर्जन मिरवणूक

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक हजार पेक्षा अधिक वर्षाची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री गुरू गंगाधर स्वामी मठातील श्री गणेशाचे भाविकांच्या उपस्थित, पालखी, दिंड्या, ढोल ताशांच्या निनादात विसर्जन करण्यात आले. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी रात्री बारा वाजता सुरूवात झाली. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मिरवणुक गावातील नदीवर पोहाचली. 17 तासांपेक्षा अधिक वेळ ही मिरवणूक सुरू होती.

करोनामुळे दोन वर्षांपासून उत्सवांवर विरजण पडले होते. निर्बंध उठताच या वर्षी सर्वत्र गणेशोत्सव जल्लोष साजरा करण्यात आला. कोरोना नियमात शिथिलता मिळताच या वर्षी गावात भाविकांनी अत्यंत उत्साहाने उत्सव साजरा केला. अनंत चतुर्दशीला रात्री बारा वाजता मठातून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. सर्वात पुढे दिंड्या त्यानंतर मठातील श्री गणेशाची मिरवणूक, त्यामागे संत गुलाब पुरी महाराज मंदिरातील श्री गणेशाची मिरवणूक होती. यानंतर गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी बाप्पासह मिरवणुकी सहभागी झाली होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती.

भाविकांच्या अलोट गर्दीने श्री गणेशाचे दर्शन घेतले. मठाधिपती शिवशंकर महाराज यांचेसह भाविकांनी श्री गणेशाची आरती करून विसर्जन केले. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत नेरपिंगळाईसह अमरावती व इतर जिल्ह्यातील भाविक सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी शिरखेडचे ठाणेदार हेमंत कडुकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस प्रशासन सज्ज होते. त्यांना गावातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

दिंड्या, पावली व जल्लोष

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने दिंड्या सहभागी झाल्या होत्या. टाळ-मृदुंगांच्या गजरात भाविकांना पावली करण्याचा मोह आवरता आला नाही. हा उत्साह मिरवणूक सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत कायम होता.

लोटांगणाची परंपरा

नेरपिंगळाई येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री गुरु गंगाधर स्वामी मठातील श्री गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर अनेक जण नदीत डुबकी घेतात. त्यानंतर काहींचे लोटांगण सुरू होते. खडकाळ रस्त्यातून सुरू झालेल्या लोटांगणाचा मठामध्ये समारोप होतो. परंपरेनुसार हजारो भाविकांनी लोटांगण घातले. ते पाहण्यासाठी विसर्जन स्थळापासून मठापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती.

विंग्स फाऊंडेशनद्वारे निर्माल्य संकलन

विसर्जनादरम्यान गावातील विंग्ज फाऊंडेशनद्वारे निर्माल्य संकलन करण्यात आले. गावतील नदी स्वच्छ राहावी यासाठी फाऊंडेशन मागील काही वर्षांपासून कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...