आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस:बाजार समितीच्या नियंत्रणात कापूस विक्रीमुळे चांगल्या दराची शक्यता

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीत खासगी कापूस खरेदीदार बाजार समितीच्या आवारात नाहीतर आपापल्या जागेवर कापूस खरेदी करत आहेत. मागील अनेक वर्षानंतर यंदा मात्र, पहिल्यांदाच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीच्या टीएमसी यार्डवर हा बाजार सुरू होईल. बाजार समितीच्या नियंत्रणात खरेदी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी चांगला भाव पडणार आहे. दरम्यान,आर्थिक व्यवहार किंवा बाजाराशी संबंधित अन्य काही अडचण आल्यास शेतकरी बाजार समितीकडे दाद मागू शकणार आहेत.

यंदा अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन सुमारे ४० टक्के घटणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यातच शासनाने जाहीर केलेला हमीभाव फारच कमी आहे. त्यामुळे शासकीय कापूस खरेदीकडे शेतकरी जाणार नाहीत. परिणामी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. अशा स्थितीत बाजार समितीतील खरेदीची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या अमरावती शहरात दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख क्विंटल कापसाची उलाढाल होते. बाजार समितीच्या नियंत्रणात बाजार सुरू झाल्यानंतर ‘सेस’ रुपात बाजार समिती प्रशासनाला आर्थिक फायदा होईल तर शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी हक्काचा बाजार उपलब्ध होईल.

कापूस बाजार एपीएमसीच्या आवारात भरावा, यासाठी एमपीएमसीने कापूस खरेदीदार व आडते यांची पहिली बैठक ३१ ऑक्टोबरला घेतली आहे. अमरावती शहरात कापसाची मोठी बाजारपेठ असून, सुमारे ७० ते ७५ खरेदीदार आहेत. मात्र, हे सर्व आपाआपल्या जागेत कापूस खरेदी करतात. शेतकरी थेट त्यांच्याकडे जाऊन कापूस विक्री करतात. बाजार समितीच्या नियंत्रणात कापूस बाजार भरल्यास बाजार समितीला कापूस खरेदी विक्रीच्या व्यवहारातून ‘सेस’ मिळणार आहे. दरम्यान, या खरेदीसंदर्भांत पहिल्या बैठकीला ३० ते ३५ खरेदीदार व आडते उपस्थित होते. त्यांनी काही मुलभूत अडचणी बाजार समिती प्रशासनासमोर मांडल्या आहेत. प्रशासनाने या सुविधा पुरवण्याचे मान्य करुन कामाला सुरूवात देखील केली आहे. कापूस बाजार बाजार समिती आवारातील ‘टीएमसी’ यार्ड वर भरणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सद्य:स्थितीत २३ खरेदीदार, ३२ आडते आणि ३ प्रोसेसिंग युनिटने परवाना घेतला आहे. तसेच परवाना देण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

शेतकऱ्यांचा होणार फायदा
कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या यार्ड वर खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना खासगी बाजारात कापूस विक्री करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना बाजार, व्यवहारासंबधी अडचणी आल्यास हक्काने बाजार समिती प्रशासनाकडे दाद मागता येतील. कापसाला चांगला भाव मिळावा, या उद्देशाने हा बाजार भरवण्यात येत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा हाेणार अाहे.-पवन देशमुख, निरीक्षक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती.

शहराबाहेरील जिनिंगवर बाजार समितीचे कर्मचारी
बाजार समितीमध्ये कापूस बाजार सुरू झाल्यानंतर शहरातील सर्व जिनिंगची खरेदी ‘टीएमसी’ यार्ड वर होईल. याचवेळी शहराबाहेरच्या जिनिंगवर बाजार समितीचे कर्मचारी हजर राहतील व त्याठिकाणी होणाऱ्या दैनंदिन कापूस खरेदीच्या नोंदी ते ठेवतील. खासगी बाजारात ती सुविधा शेतकऱ्यांना नाही. धान्य बाजाराप्रमाणे याठिकाणीसुद्धा कापूस खरेदी करणारे अनेक व्यापारी राहतील, त्यामुळे दररोज कापसाचा लिलाव होईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. तसेच बाजार समितीला खरेदीदारांकडून सेससुद्धा मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...