आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भूमापन करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात ‘प्रहार’चे भजन आंदोलन ; मालमत्ता पत्रक मिळण्यात अडचण

अमरावती18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव, रहाटगाव व गाडगेनगर परिसरातील भूमापन वारंवार माहिती देऊन व अवगत करूनही करण्यात आले नाही. याच्या निषेधार्थ प्रहारच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भजन आंदोलन केले. भूमिअभिलेख कार्यालयाला वारंवार अवगत करूनही मौजे शेगाव, रहाटगाव व गाडगेनगर परिसरातील भूमापन करण्यात आले नाही. यामध्ये अभिनव कॉलनी, श्रीरामनगर, इंद्रप्रस्थ कॉलनी, संमती कॉलनी, पद्मसौरभ कॉलनी, ओम शिव निकेतन कॉलनी, म्हाडा कॉलनी, संगीतानगर, अयोध्या कॉलनी, लांडगेनगर, सोनल कॉलनी, करवा लेआऊट, रत्नदीप कॉलनी, तिरुपती कॉलनीसह अन्य २५ ते ३० कॉलनी व नगरांचा समावेश आहे. भूमापन न झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मालमत्ता पत्रक (पी.आर. कार्ड) मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. मध्यंतरी तहसील कार्यालयाने अकृषक करण्यात आलेल्या भागातील गाव नमुना देणे बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यांना विनंती केल्यावर तूर्तास गाव नमुना नोंदणी सुरू ठेवण्याचे मान्य करण्यात आले. परंतु, कुठल्याही दिवशी संबंधित कार्यालय पुन्हा गाव नमुने देणे बंद करू शकते. अशा परिस्थितीत या परिसरातील नागरिकांना भूमापन न झाल्यामुळे पीआर कार्डअभावी मालमत्ता विक्री करता येणार नाही. त्यामुळे या परिसरात तातडीने भूमापन करून मालमत्ता पत्रक देण्याच्या मागणीसाठी प्रहारच्या वतीने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भजन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात प्रहार संपर्क प्रमुख चंदू खेडकर, गुड्डू ढोरे, विजय खटके, उमेश पांडे, सुनील भुजाडे, बाळासाहेब आसटकर, मारोती नागदिवे, रिंकू कडू, राहुल ठाकरे, श्रीदेव खेडकर, पंकज श्रीराव यांच्यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...