आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहे गुरु का खालसा, वाहे गुरु की फतेह!:गुरुनानक जयंतीदिनी भजन-किर्तन; 10 हजार नागरिकांचे लंगर, आठवडाभर गुरुबाणी

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिख पंथाचे प्रेरणास्रोत, प्रथम महान गुरु श्री गुरुनानक देवजी यांच्या 553 व्या जयंतीनिमित्त आज, मंगळवार, 8 नोव्हेेेंबरला राजापेठ स्थित गुरुद्वारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर भजन-किर्तन व अरदास सुरु होती. या काळात 10 हजार नागरिकांनी लंगरचा लाभ घेतला. शहरातील विविध लोकप्रतिनिधींसह सनदी अधिकाऱ्यांनी गुरुद्वाऱ्यात पोहचून मत्था टेकला.

येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंघ सभेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून येथे विविध कार्यक्रम सुरु होते. देशभरातील विविध ठिकाणाहून आमंत्रित केलेल्या जत्थेदारांनी भजन-किर्तन केले. इंदोर, अमृतसर आणि नागपुर येथील खास जत्थेदारांनी गुरु ग्रंथ साहिबची अरदास करत किर्तन केले. किर्तनातील त्यांच्या शब्दांमुळे अमरावतीकर अगदी मंत्रमुग्ध झाले होते. सकाळी 8.00 वाजता सुखमणी साहेबजीचा पाठ झाला. त्यानंतर तासाभराने अखंड पाठ साहेबजीचा समारोप करण्यात आला. याचवेळी गुरुद्वारामध्ये रक्तदान शिबिरही घेण्यात आले. सिख समाजाच्या अनेक तरुणांनी या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.

सकाळी 10 ते 11 या वेळात अमरावती येथील भाई भूपिंदपरसिंगजी यांच्या हजुरी जत्थ्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी 1.00 वाजेपर्यंत अमृतसर येथील भाई हरमितसिंगजी यांचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यानंतर लंगर सुरु झाला. लंगरमध्ये सुमारे 10 हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री 8.00 ते 11 या वेळात पुन्हा अमरावती व अमृसरच्या जत्थेदारांनी आपल्या अमृतवाणीने अमरावतीकरांना रिझविले. दरम्यानच्या काळात अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपचे महानगर अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हाधिकारी पवनीत कौर आदींनी गुरुद्वाराला भेट देऊन मत्था टेकला.

गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील नगर किर्तनाद्वारे पूर्ण शहरभर वातावरण निर्मिती करण्यात आली होती. गुरुद्वारामध्ये दररोज श्री सुखमणीसाहेब पाठही घेण्यात आला. या आयोजनासाठी गुरुद्वारा गुरुसिंघ सभेचे पदाधिकारी गुरविंदरसिंह बेदी, राजेंद्रसिंह सलूजा, डॉ निक्कू खालसा, अमरजोतसिंह जग्गी, दिलीपसिंह बग्गा, रवींद्रसिंह सलूजा, सतपालसिंह बग्गा, रतनदीपसिंघ बग्गा, हरप्रीतसिंह गांधी, जगदीशलाल छाबड़ा, मनजीतसिंह होरा, हिमिंद्रसिंह पोपली, नरेंद्रपालसिंह अरोरा, अजिंदरसिंह मोंगा, राजसिंह छाबड़ा, रविंद्रपालसिंह अरोरा, भूपिंदरसिंह सलूजा, तेजिंदरसिंह उबवेजा, गुरविंदरसिंघ नंदा, पुष्पाल बग्गा, निक्की अरोरा, रानी सलूजा, स्वीटी सलूजा, लड़ी सलूजा, कमल कौर मोंगा, अमृतकौर जुनेजा, आर्शी छाबड़ा, मनप्रीत कौर, मनजीत नंदा, कवलजीतकौर नंदा, सतनाम कौर, शीना कौर, अंजूकौर मोंगा, काजलकौर जग्गी, डॉली कौर नंदा रोमा चेलानी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...