आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूड न्यूज:भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे अमरावतीकरांना दक्षिणेतील धार्मिक स्थळांच्या दर्शनाची संधी!

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्ग भ्रमण, हवाई यात्रा, जहाजातील प्रवास अशा वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या भारतीय रेल्वेने (आयआरसीटीसी) आता धार्मिक स्थळांच्या दर्शनाचीही सोय उपलब्ध करुन दिली आहे. या सोयीचे वैशिष्ट्य असे की यामध्ये अमरावतीकरांना सहभागी होण्याची संधी असून नव्या कोऱ्या रेल्वेने ते दक्षीणेतील मंदिरे व तेथील सांस्कृतिक व धार्मिक वारसा बघू शकतील.

रेल्वेचा पर्यटन विभाग सांभाळणाऱ्या सह महाव्यवस्थापक डॉ. क्रांती सावरकर यांनी आज, गुरुवारी येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्यामते २५ मे रोजी ही पहिली रेल्वे गाडी वर्धा नजिकच्या सेवाग्राम रेल्वे स्टेशनवरुन रवाना होत असून ७ रात्री व ८ दिवसांची सहल संपवून १ जून रोजी परतणार आहे.

यासाठी ऑनलाइन बुकींगची सोय उपलब्ध असून इच्छूक पर्यटक आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ www.irctctourism.com वर बुकींग करु शकतात. या धार्मिक पर्यटनामध्ये रामेश्वरम, मदुरई, तिरुपती आणि श्रीसैलम-मल्लिकार्जुना ज्योतीर्लिंगाचे दर्शन केले जाणार आहे. ही रेल्वे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत महिन्यातून किमान एकदा धावेल, असेही याप्रसंगी डॉ. सावरकर यांनी स्पष्ट केले.

या धार्मिक सहलीमध्ये ७२० प्रवाशांना सहभागी होता येणार असून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ अशी पद्धत वापरली जाणार आहे. या प्रवासासाठीची सदर रेल्वेगाडी छत्तीसगढमधील बिलासपूर येथून प्रारंभ होणार असून भाटापारा, तिल्दा नोरा, रायपुर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, तिरोडा, भंडारा, नागपुर, सेवाग्राम मार्गे पुढच्या प्रवासाला जाईल. विशेष असे की आठवडाभराच्या प्रवासादरम्यान प्रवाशांची भोजन, नाश्ता, चहापाणी व राहण्याची सोय रेल्वेतर्फे केली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक अमरावतीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. क्रांती सावरकर यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला भुसावळचे रेल्वे स्टेशन अधिकारी केशव पाटणकर, प्राचार्य डॉ. संजय खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

भविष्यात एसी ट्रेन, बडनेरातूनही प्रारंभ

अमरावती हे मूळ गाव असलेल्या रेल्वेच्या सहमहाव्यवस्थापक डॉ. क्रांती सावरकर यांनी या शहरासाठीच्या योगदानासंदर्भातही सांगितले. त्यांच्यामते ही रेल्वे स्लीपर कोच आहे. परंतु भविष्यात ती एसी असण्यासोबतच मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील बडनेरा स्टेशनवरुन ती धावेल, अशीही व्यवस्था केली जाणार आहे. त्यांच्यामते एक अमरावतीकर म्हणून मी स्वत: ही व्यवस्था करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे.