आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीम आर्मी:खा.नवनीत राणा यांच्या घरासमोर भीम आर्मी करणार 9 जूनला संविधान उद्देशिकेचे वाचन ; रितेश तेलमोरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह, जिल्ह्यातील राजकीय वातावरण दूषित झाले आहे. याला सर्वस्वी जबाबदार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा असल्याचे भीम आर्मी संघटनेचे म्हणणे आहे. तसेच हनुमान चालिसा पठण करण्याच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम राणा दाम्पत्य करीत असल्याचा आरोपही भीम आर्मीने केला आहे. राणा दाम्पत्याला राज्यघटनेचा विसर पडला. त्यामुळे गुरुवार,दि. ९ जून रोजी खा. नवनीत राणा यांच्या घरासमोर राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी पत्रपरिषदेत दिली. भीम आर्मीच्या म्हणण्यानुसार, राज्यघटनेवर चालणाऱ्या देशात हनुमान चालिसा पठण करून राजकारण करणाऱ्या राणा दाम्पत्याने जिल्ह्याचा कोणता विकास केला. लोकसभेत जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. मात्र, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, शहराचा, जिल्ह्याचा विकास व इतर कोणत्याही प्रश्नावर बोलत नसल्याचे भीम आर्मीने आरोप केला आहे. हनुमान चालिसा वाचायला पाहिजे, तो सर्वांचा अधिकार आहे. मात्र, हनुमान चालिसाच्या नावावर राजकारण करणे हे योग्य नसल्याचे भीम आर्मीचे म्हणणे आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून घेतलेल्या शपथेचा विसर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना पडला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला जागे करण्यासाठी ९ जून रोजी राणा यांच्या घरासमोर उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मी जिल्हाध्यक्ष रितेश तेलमोरे यांनी दिली. या वेळी पत्रकार परिषदेला जिल्हा महासचिव कैलास नाईक, जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात, बडनेरा शहराध्यक्ष प्रदीप उसरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...