आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उन्हापासून बचावासाठी पक्षी घेतात पाणवठ्यांचा आधार; थंडावा देणाऱ्या वड, पिंपळ, कडूनिंब वृक्षांचा घेतात आसरा

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उकाड्यामुळे मनुष्यच नव्हे तर पक्षीही कासावीस होत आहे. उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पक्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांजवळ थंडाव्यात वावरतात. तसेच थंडावा देणाऱ्या वड, पिंपळ, कडूनिंब अशा वृक्षांचा आधार घेतात, अशी माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली आहे. उकाड्यात मनुष्याला उष्माघाताचा धोका असतो तसाच पक्ष्यांनाही असतो. यात मनुष्य तर आपला बचाव करतो. मात्र, पक्ष्यांचे काय? असा कोणालाही प्रश्न पडेल. हे पक्षी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करतात तरी काय असा प्रश्न पडतो. उष्माघातापासून बचाव व्हावा, यासाठी पक्षी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. वाढत्या तापमानात पक्षी भरपूर पाणी पितात. तसेच ज्या ठिकाणी थंडावा असेल असे पाणवठे, डेरेदार वृक्ष, गर्द वनराई अशा ठिकाणी आश्रय घेतात. यामुळे उकाड्यापासून ते आपला बचाव करतात, असे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.

यंदा होळीपूर्वीच पारा चढला. सध्या जिल्ह्यात ४२ ते ४३ अंश सेल्सिअस सरासरी तापमान आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मनुष्याप्रमाणेच पाळीव प्राणी, पक्षी किंवा वन्य जीवांवरही वातावरण बदलाचा परिणाम होत असतो. प्राण्यांच्या शरीराचे तापमान मानवी तापमानापेक्षा जास्त असल्याने उन्हाळ्यात त्यांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो. सध्या वाढलेल्या तापमानाचा पक्ष्यांनाही फटका बसत आहे. उष्णतेमुळे शरीरातले पाणी कमी झाल्याने प्राणी आजारी पडतात. त्यांना विविध उन्हाळी सांसर्गिक आजार होतात. अशा प्राण्यांवर वेळीच उपचार न केल्यास त्यांचा मृत्यू होण्याचा धोका असतो. पाळीव प्राण्यांना उपचार मिळतात. परंतु, वन्यजीवांसह पक्ष्यांना उन्हाच्या त्रासापासून वाचवणे अवघड असल्याचे पक्षी अभ्यासकांचे मत आहे.

पक्षी उन्हाळ्यात भरपूर पाणी पितात
पक्षी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पितात, तसेच घनदाट वृक्षांच्या छायेत जातात. जेथे त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित अशा अशा थंड ठिकाणी पक्षी विसावा घेतात. त्यामुळे उकाड्यापासून ते स्वतःचा बचाव करतात.
- यादव तरटे, पक्षी अभ्यासक.

बातम्या आणखी आहेत...