आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरुड तहसील कार्यालयात तत्कालीन नायब तहसीलदारांना मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने 3 महिने कारावास, 20 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये वरुडचे नायब तहसीलदार यांच्यासोबत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा वरुड पोलीस स्टेशनमध्ये डॉ. बोंडेंवर दाखल झाला होता. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील माझ्या लोकांची 240 प्रकरणे त्रुटीमध्ये का काढली, अशी विचारणा करून डॉ. अनिल बोंडे यांनी नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांना शिवीगाळ केली.
दरम्यान अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर त्यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील शासन निर्णयाची प्रत व फाइल फाडून जिवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांनी वरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंगाळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर प्रकरणात न्यायाधिश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयामध्ये 8 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने डॉ. अनिल बोंडे यांना 3 महिने कारावास, 20 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारवासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मिलिंद शरद जोशी यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
अनिल बोंडेंना जामीन मंजूर
माजी आमदार अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला व न्यायालयाने अनिल बोंडे यांना १ लाख रुपयांच्या जामिनावर लगेच मुक्त केले. या प्रकरणात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.