आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • BJP Prepares Strongly For Legislative Council Elections, Deputy Chief Minister, State President Will Be Present To File Candidature Of Ranjit Patil

अमरावती विधान परिषद निवडणूक:रणजीत पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून मावळते आमदार डॉ. रणजीत पाटील बुधवार, 11 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहतील, अशी माहिती निवडणूक प्रमुख चैनसुख संचेती यांनी दिली.

ते म्हणाले, सन 1980 पर्यंत भाजपच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ 2010 सालापर्यंत गैरभाजप उमेदवाराच्या ताब्यात होता. 2010 साली भाजपने या मतदारसंघात पुन्हा विजय प्राप्त केला असून सध्या तो याच पक्षाच्या ताब्यात आहे. यावेळी तिसऱ्यांदा आम्ही ही निवडणूक लढतो आहोत. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी भाजपने केली असून यावेळीही विजयी पताका आमचीच फडकेल, असा विश्वासही संचेती यांनी व्यक्त केला. दरम्यान उमेदवारी दाखल करण्यापूर्वी त्याच दिवशी पदवीधरांचा मेळावा घेतला जाणार असल्याचीही माहिती दिली.

संचेती म्हणाले, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या दीड वर्ष आधीपासूनच मतदार नोंदणीला प्रारंभ केला. संघटनेच्या बळावर गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपने नेत्रदीपक यश मिळविले. आगामी 30 जानेवारी रोजी होणारी निवडणूकदेखील जिंकण्याच्या हेतूनेच कार्यकर्ते कामाला लागले आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. रामदास आंबटकर, उमेदवार डॉ. रणजीत पाटील, आमदार प्रताप अडसड, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहर अध्यक्ष किरण पातुरकर, डॉ. नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी शहराध्यक्ष जयंत डेहनकर, मनपाचे माजी सभापती तुषार भारतीय, माजी जि.प. सदस्य प्रवीण तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पाटील यांनी ‘त्या’ मुद्द्यांवरील अपयश विनम्रपणे झाकले

आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी गेल्या 12 वर्षाच्या काळात आमदार आणि काही काळ मंत्री म्हणून केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. याच दरम्यान झालेल्या सत्ताबदलामुळे त्यांना काही काळ विरोधी बाकावरही बसावे लागले. दरम्यान पदवीधरांचे आमदार असूनही विद्यापीठातील रिक्त जागांची भरती, जिल्हास्तरावरील सुविधा केंद्रे, बुलडाणा येथील मॉ़डेल कॉलेजचा रखडलेला मुद्दा, अलिकडेच पार पडलेल्या सिनेट निवडणुकीतील पराभव, जुनी पेन्शन आदी मुद्दे येत्या काळात सोडवू, असे म्हणत त्यांनी त्याबाबतचे अपयश अत्यंत विनम्रपणे झाकण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...