आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्रहीन मुलीला व्हायचेय IAS:सनदी अधिकाऱ्यांचे मदतीचे आश्वासन, विकलांग मुलीला लाडु भरवताना डोळयात तरळले अश्रू

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्रहीन बेवारस माला या मुलीला जिल्हाधिकारी बनण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व येथील जिल्हाधिकारी पवनीत कौर सहकार्य व मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही सनदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह नुकतीच वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद व बेवारस मुला-मुलींच्या बालगृहाला भेट दिली. यावेळी त्यांना मालाची आस्थेवाइकपणे चौकशी करत तिला आशिर्वाद दिला.

जिल्हाधिकारी व्हायचे आहे

परतवाडा येथून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वझ्झर फाटा येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद व बेवारस बालगृहामध्ये या अधिकाऱ्यांनी जे अनुभवले, ते वर्णनापलीकडचे आहे, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. संत गाडगे बाबा विद्यापीठाच्या बी.ए. अंतीम वर्षाच्या परीक्षेत 76 टक्के गुण घेवून प्राविण्य मिळविले आहे. सध्या ती एमपीएससीची तयारी करीत आहे. हे ऐकूण वर्मा यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी तिला लगेच आपल्याजवळ घेत विचारणा केली की तुझी महत्त्वाकांक्षा काय आहे ? तेव्हा माला म्हणाली मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. मनिषा वर्मा यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना मार्गदर्शन करण्याबाबत कळविले. त्यानंतर दोन्ही सनदी अधिकाऱ्यांनी आम्ही तुला संपुर्ण मार्गदर्शन करु, असे आश्वासन दिले.

डोळयात अश्रू तरळले

दरम्यान आश्रमचे संचालक शंकरबाबा पापळकर यांचे कार्य पाहून दोन्ही सनदी अधिकारी आश्चर्यचकीत झाल्या. त्यांनी मुलींच्या वस्तीगृहाची बारकाईने पाहणी केली. तेथील गरजाही जाणून घेतल्या. बालगृहाच्या वॉर्डन वर्षा काळे यांनी सर्व मुलींसोबत भेट घडवली. वर्मा, कौर यांनी सोबत मोतीचूरचे लाडू आणले होते. त्यांनी प्रेमाने सर्वांना लाडू देऊन विचारपूस केली. सरोज नावाच्या बहुविकलांग मुलीच्या तोंडात लाडू भरवताना दोन्ही अधिकारी महिलांच्या डोळयात अश्रू तरळले. नंतर त्यांनी बाबांच्या झोपडीमध्ये बसून शंकरबाबांशी चर्चा केली.

आजीवन पुनर्वसनाचा कायदा

सन 2003 साली मनिषा वर्मा अमरावतीच्या जिल्हाधिकारी होत्या. तेव्हापासून त्या शंकर बाबांच्या आश्रमाला सतत भेट देवून सहकार्य करतात. त्यांनी एका मुलीचे पालकत्व स्वीकारुन तिचा विवाह करुन दिला आहे. चर्चेदरम्यान शंकरबाबांनी त्यांना विनंती केली की, 18 वर्षांवरील मुलांचे आजीवन पुनर्वसन करण्याचा कायदा करून सहकार्य करावे. सध्या बेवारसांना 18 वर्षांपर्यंतच पुनर्वसनासाठी मदत करता येते. त्यानंतर त्यांनी स्वबळावर जगावे, असे कायदा सांगतो. परंतु अपंगत्व आणि इतर कारणांमुळे ते शक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...