आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मशिदीत रक्तदान शिबिर ; हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा अनोखा उपक्रम

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी सोमवारी साबनपुरा येथील मशीदीमध्ये (मरकज) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मशिदीमध्ये असा उपक्रम घडून आला असून सर्वधर्मसमभावाचे याहून वेगळे उदाहरण असू शकत नाही, अशा प्रतिक्रिया त्यानिमित्ताने व्यक्त केल्या जात आहे. या शिबिरात दिवसभरात ४३ जणांनी रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. साबनपुरा मशीदीच्या हॉलमध्ये आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी माजी महापौर विलास इंगोले, शेतकरी नेते विजय विल्हेकर, शिवसेनेचे सुनील खराटे, सुरेश रतावा, प्रा. डॉ. संजय तिरथकर, निसारभाई, जावेदभाई, नितीन चौधरी, प्रदीप पाटील, रफीकभाई, निवृत्त पोलिस निरीक्षक शेख सुलतान, गुन्हे शाखेचे पीआय अर्जुन ठोसरे आदी उपस्थित होते. रक्तदानासाठी दुपारी २ पर्यंतची वेळ देण्यात आली होती. परंतु सायंकाळपर्यंत हा उपक्रम चालला. गुलशन स्पोर्टिंग क्लब, जाणीव प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, म. फुले सेवा संघ, राष्ट्रसेवा दल व दी ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. रक्तदान करणाऱ्यांसह अतिथींना ‘शिवरायांचे निष्ठावान मुस्लिम सैनिक’ हे पुस्तक आणि पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे रक्त संकलन अधिकारी डॉ. आशिष वाघमारे यांच्या नेतृत्वात तंत्रज्ञ मनोज भाकरे, धीरज बोबडे, मंगेश उमप, संगीता गायधने, प्रवीण कळसकर यांनी शिबिराची कारवाई पूर्ण केले.

महिला, मौलवी, भंतेजींचेही रक्तदान या रक्तदान शिबिरात मुस्लिम महिला आणि मौलवींनीही रक्तदान केले. एरवी मुस्लिम समुदायामध्ये असे उपक्रम घेतले जात नाहीत, असा रुढ समज आहे. परंतु या आयोजनाने हा समज तद्दन खोटा ठरविला. दरम्यान, रक्तदान शिबिर घेऊन आम्ही थांबणार नसून भविष्यात यापेक्षाही वेगवेगळे उपक्रम राबवून समाजसेवेचे हे व्रत अखंड सुरु ठेऊ, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

अनुकरणीय उपक्रम हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ स्तुत्यच नाही तर अनुकरणीय आहे. गेल्या काही दिवसात शहरात समाजा-समाजात भेद निर्माण करणाऱ्या काही घटना घडल्या. त्यामुळे शहराच्या नावाला गालबोट लागले होते. परंतु अशा प्रकारच्या उपक्रमामुळे ती कटू ओळख पुसून टाकण्याला मोठी मदत होत असल्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, विलास इंगोले व शिवसेनेचे सुनील खराटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...