आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:शाहू महाराज जयंतीनिमित्त रक्तदान, ‘सारथी’चा विभागीय पातळीवर विस्तार

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सारथीतर्फे (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) रविवारी येथील नियोजन भवनात बेरोजगार युवकांचा मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. दरम्यान सारथीचा विभागस्तरीय विस्तार लवकरच केला जाणार असून, येथे विभागीय मुख्यालय उघडले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ‘सारथी’चे वरिष्ठ प्रकल्प संचालक (सामाजिक न्याय) डी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला उपायुक्त संजय पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, अारडीसी आशिष बिजवल, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, उपजिल्हाधिकारी रणजित भोसले, समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे, जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक मयुराताई देशमुख, ज्येष्ठ पर्यावरणवादी प्रवीण वासनिक, सहायक रोजगार व उद्योजकता आयुक्त प्रफुल्ल शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तसेच रोहित मोंढे, मराठा सेवा संघाचे अरविंद गावंडे, अश्विन चौधरी, मराठा महासंघाचे भाऊसाहेब निचळ, जयसिंहराव देशमुख, पल्लवी काठोळे उपस्थित होते.

सारथी ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असून, त्यासाठी विविध विभागांच्या सहकार्याने अनेक उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. विशेषत: कौशल्य विकास व रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला असून, अधिकाधिक युवकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय महसूल उपायुक्त संजय पवार यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी संवाद-सूचना कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, इंग्रजीसहित इतर भाषांवर प्रभुत्व, आत्मविश्वास वृद्धी, व्यावसायिक मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य, नैसर्गिक कल कौशल्य आदी विविध कार्यक्रम शासनातर्फे राबवण्यात येतात. कौशल्याधारित प्रशिक्षणातून अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. त्याचा युवकांनी लाभ घ्यावा, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाध्यक्ष देशमुख म्हणाले, ‘सारथी’चे विभागीय कार्यालय अमरावतीत लवकरच कार्यान्वित होईल. त्यादृष्टीने जागेबाबत गतीने प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे, पुढील काळात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, अभ्यासिका आदी उपक्रमही हाती घेण्याचे नियोजन आहे. याप्रसंगी किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण, रोजगारविषयक संधींची माहितीही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्ा. डाॅ. नरेशचंद्र काठाेळे यांनी केले. या वेळी माजी उपजिल्हाधिकारी मनोहरराव कडू, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, निवेदिका क्षिप्रा मानकर, आरोग्य समन्वयक वैभव तेटू, माजी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय जगताप, प्रा. अंबादास मोहिते, प्रा. रवींद्र दांडगे, तालुका उपनिबंधक राजेश भुयार, शोभा रोकडे यांच्यासह युवक, महिला उपस्थित होते.