आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल:खरी माहिती लपवण्यासाठी बनवल्या बोगस कॉन्ट्रॅक्ट नोट, लेजर स्टेटमेंट

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्यातील ७९ गुंतवणूकदारांनी ‘अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकर प्रा. लिमिटेड’च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना त्यांच्या शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाची माहिती वेळोवळी ऑनलाइन उपलब्ध व्हायची. त्यावेळी ‘अनुग्रह’ने गुंतवणूकदारांपासून खरी माहिती लपवण्यासाठी म्युच्युअल फंडांचे बोगस कॉन्ट्रॅक्ट नोट, लेजर व अन्य स्टेटमेन्ट आदी बोगस बनवून गुंतवणूकदारांसोबत बनवेगिरी केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आर्थीक गुन्हे शाखा या प्रकरणात आता सखोल तपास करणार आहे.

‘अनुग्रह’ने गुंतवणूकदारांचे शेअर्स परस्पर दुसरीकडे गुंतवले हे गुंतवणूकदारांना दाखवलेच नाही. त्यामुळे आपली रक्कम सुरक्षित आहे, असेच गुंतवणूकदारांना वाटले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शहर व जिल्ह्यातील ७९ जणांची तब्बल १८ कोटी ५६ लाख ७३ हजार ६३४ रुपयांनी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. शहरातील रिषभ राजेश सिकची (२७) यांच्या तक्रारीवरुन ‘अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकर प्रा. लीमीटेड’चे संचालक परेश मुलजी कारीया, ‘तेजीमंदी डॉटकॉम’चे संचालक अनिल गांधी, एडलवाईज कस्टोडीअल सर्व्हीस, एनएसईचे एमडी विक्रम लिमये, एलनएचईचे मुख्य रेग्यूलेटरी ऑफीसर आणि सीडिएसएल संस्था या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

आर्थीक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, रिषभ सिकची व अन्य गुंतवणूकदारांनी ‘अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकर’च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. सुरूवातीला काही दिवस ‘अनुग्रह’कडून गुंतवणूकदारांना गुंतवणूकीतील नफासुध्दा मिळत होता. मात्र ‘अनुग्रह’ने कस्टोडीअन म्हणून ‘एडलवाईज’सोबत व्यवहार केला. तसेच गुंतवणूकदारांचे शेअर्स परस्परच ‘एडलवाईज’कडे गहाण ठेवून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली. ही रक्कम वेळेत ‘अनुग्रह’ने परत न केल्यामुळे ‘एडलवाईज’ने गुंतवणूकदारांच्या शेअर्सची परस्पर विक्री करुन अनुग्रहला दिलेली आपली रक्कम वसूल केली. वास्तविकत: शेअर्स मालकाच्या परवानगीशिवाय शेअर्सची विक्री करता येत नाही. असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शेअर मार्केटमधील व्यवहारावर ‘सुपरव्हीजन’ करण्यासाठी ‘एनएसई’ व ‘सिडिएसएल’ ही यंत्रणा काम करते. गुंतवणूकदारांचे शेअर्स योग्य आहेत का? त्यांना परतावा मिळतो किंवा नाही, याबाबत निरीक्षण करण्याची जबाबदारी एनएसई व सीडीएसएलची आहे. एनएसई ही सेबी अतंर्गत काम करते. सेबीने २०२० मध्ये ‘एनएससी’ला आदेश दिले की, या प्रकरणात पडताळणी करुन ‘अनुग्रह’वर कारवाई करावी, मात्र एनएससीने सेबीच्या आदेशाकडे त्यावेळी दुर्लक्ष केले. सेबिने आदेश दिल्यानंतर एनएससीने त्याचवेळी या प्रकरणात लक्ष घातले असते तर कदाचित हे प्रकरण वेळीच समोर आले असते, असे आर्थीक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले होते. त्यामुळे आर्थीक गुन्हे शाखेने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच प्रकरणात खासदार नवनित राणा यांनी १३ जुलै २०२२ ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून सीबीआयव्दारे चौकशीची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...