आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपहरण:मालामाल होण्यासाठी सावत्र आजीनेच मैत्रिणीमार्फत केले नातवाचे अपहरण

अमरावती4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुरड्या नयनच्या अपहरण प्रकरणात सावत्र आजीसह अटक केलेल्या आरोपींसह अमरावती शहर पोलिस. इनसेट चिमुरडा नयन लुनिया. - Divya Marathi
चिमुरड्या नयनच्या अपहरण प्रकरणात सावत्र आजीसह अटक केलेल्या आरोपींसह अमरावती शहर पोलिस. इनसेट चिमुरडा नयन लुनिया.
  • चिमुरड्या नयनच्या अपहरण प्रकरणात सावत्र आजीसह सहा जणांना पोलिसांनी केली अटक

चिमुकल्या नातवाचे अपहरण करा अन् भरभक्कम रकमेच्या खंडणीची आपल्याच कुटुंबीयांकडे मागणी करा, असे सांगणारी ही कोणती आजी राहू शकते का? याचे उत्तर आजपर्यंत आपण नाही, असे दिले असते मात्र, अमरावतीत अशीही एक ४७ वर्षीय सावत्र आजी निघाली की तिने आपल्या नातवालाच मैत्रिणीकरवी ‘प्रोफेशन किडनॅपर’द्वारे अपहरण करण्यास सांगितले. केवळ पैशांसाठी सावत्र आजीनेच हा संपूर्ण प्लॅन रचला होता. मात्र अमरावती पोलिसांच्या महत्प्रयासाने व अथक मेहनतीने या आजीचा व किडनॅपर टाेळीचा पर्दाफाश झाला. शहर पोलिसांनी चिमुकल्याच्या आजीसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नयन लुनिया अपहरण प्रकरणात पोलिसांनी सपना ऊर्फ हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५), बंबईया ऊर्फ अल्मेश ताहिर शेख (१८), अासिफ युसुफ शेख (२४), फिरोज रशिद शेख (२५ सर्व रा. कोठलानगर, अहमदनगर), मुसाहिब नासिर शेख (२१, रा. मुकुंदनगर, अहमदनगर) आणि नयनची सावत्र आजी मोनिका ऊर्फ प्रिया ऊर्फ मुन्नी जसवंतराय लुनिया (४७, रा. शारदानगर, अमरावती) यांना अटक केली आहे. नयनचे अपहरण करणाऱ्या टोळीतील मुख्य सुत्रधार ईशान शेख ऊर्फ टकलू हा पसार आहे. त्याचाही पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. ईशान ऊर्फ टकलू विरोधात तब्बल १९ गुन्हे दाखल असून, यामध्ये घरफोडी, किडनॅपिंग व खंडणीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मोनिका लुनिया हिने अहमदनगरातील मैत्रीण हिनाशी संगनमत करून प्रोफेशनल किडनॅपर टोळीच्या मदतीने चार वर्षीय नयनच्या अपहरणाचा कट रचला होता. नयनच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या दोन महिलांसह पाच आरोपींना शनिवारी अमरावतीत आणले गेले. १७ फेब्रुवारीला रात्री सुमारे ८ वाजता शारदानगरमधून नयनचे अपहरण करण्यात आले. परंतु तत्पूर्वीच एक ते दीड महिन्यापासून नयनच्या अपहरणाचा कट आरोपींनी अहमदनगरमध्ये रचला होता. नयनच्या अपहरणाची मुख्य सूत्रधार त्याची आजी मोनिका, तसेच हिना असल्याचेही समोर आले. हिनाने अहमदनगरमधील प्रोफेशनल किडनॅपरच्या मदतीने नयनच्या अपहरणाचे प्लॅनिंग केले होते. त्यानंतर अमरावतीमधील लॉजवर थांबवून त्यांनी नयनच्या अपहरणाला अंतिम रुप िदले होते. नयनची आजी मोनिकाचे माहेर अहमदनगर आहे. तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तेथील एका गरीब कुटुंबाने मोनिकाचे पालन पोषण केले. लुनिया कुटुंबीयात आल्यानंतर मोनिका ही तिच्या नगर येथील कुटुंबीयांना पैसे पुरवत होती. मोनिकाने मैत्रिण हिना व काही गुन्हेगारांना सोबत घेऊन नयनचे अपहरण केले. नयनच्या अपहरणातून लुनिया कुटुंबीयांकडे भरभक्कम रक्कम उकळायची आणि नगरच्या नातेवाईकांना द्यायची, त्यामुळेच हे अपहरण घडवण्यात आले आहे. अपहरणानंतर आरोपी लुनिया कुटुंबियांना खंडणी मागणारच होते. मात्र, पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केला. आरोपींच्या मुसक्या आवळल्या त्यामुळे खंडणी मागणे तर दूरच आरोपी पोलिसांपासून स्वत:चा बचाव सुद्धा करु शकले नाही.

आयुक्तालयाच्या इतिहासातील विक्रमी ‘रिवॉर्ड’: नयनच्या शोधासाठी अमरावती पोलिसांची विविध पथके तयार केली होती. पोलिसांनी तब्बल ४८ तास अविरत परिश्रम घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला. त्यामुळेच पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी या प्रकरणात तपास करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व अंमलदारास तब्बल ५० हजार रुपये रिवॉर्डची घोषणा केली आहे. अमरावती आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पोलिस आयुक्तांकडून तपासातील प्रत्येक पोलिसाला ५० हजारांची रक्कम रिवॉर्ड देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ब्रेव्हो! शहर पोलिस

नयनचे अपहरण झाले, त्यावेळी शहर पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नव्हता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास या माध्यमांशिवाय आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी हातात काही नव्हते. यातही एखाद्या गुन्ह्यात त्याच कुटुंबातील व्यक्ती सहभागी असेल, तर त्याची चौकशी करणे तर आवश्यक असते मात्र त्यासाठी ठोस पुरावा नसल्यामुळे कसे काय, त्या व्यक्तीला तपासासाठी बोलावायचे किंवा ताब्यात घ्यायचे. मात्र सीपी डॉ. आरती सिंग, डिसीपी शशिकांत सातव, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, क्राईम पीआय पुंडकर, पोलिस निरीक्षक किशोर सुर्यवंशी, पीआय किशोर शेळके, सायबरचे एपीआय रवींद्र सहारे, एपीआय प्रशाली काळे, एपीआय योगेश इंगळे, पीएसआय कृष्णा मापारी, जमादार अशोक वाटाने, राजेश पाटील, विनय मोहोड, किशोर महाजन, अतुल संभे, विजय राऊत, दानिश शेख, राहुल ढेंगेकर, अमोल खंडेझोड, निलेश गुल्हाने, छोटेलाल यादव, दिनेश भिसे, सागर सरदार, पवन घोम, संगीता फुसे आणि मिरा उईके या पोलिसांनी केलेल्या जिगरबाज कामगिरीने चिमुकला नयन सुखरुप परतला.

सीपी म्हणाल्या, मी सुद्धा चार वर्षाच्या बाळाची आई!चार वर्षीय चिमुकला नयनच्या अपहरणानंतर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान सीपी डॉ. आरती सिंह यांच्यासह शहर पोलिसांसमोर उभे होते. मुलाचे अपहरण झालेल्या आईची काय स्थिती असेल, ही बाब जाणून सीपी आरती सिंह यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सिंग म्हणाल्या नयनच्या आईची काय अवस्था असेल मी जाणू शकते कारण मी सुद्धा चार वर्षाच्या बाळाची आई आहे.